चोरीची बाईक विकताना अडकला, अन् अख्खी टोळीच पोलिसांच्या ताब्यात सापडली!

एकापाठोपाठ एक, तब्बल २३ दुचाकी चोरले; सराईत चोरट्यांसह मोठे रॅकेट उद्ध्वस्त!

लाल 🚨 दिवा मालेगाव, दि.२६:-(प्रतिनिधी):मालेगाव शहर आणि परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या दुचाकी चोरट्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात कॅम्प पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला मोठे यश आले आहे. पोलिसांनी एका सराईत आरोपीसह त्याच्या साथीदाराला अटक करून त्यांच्याकडून तब्बल ८ लाख २० हजार रुपये किमतीच्या २३ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या मोठ्या कारवाईमुळे वाहनचोरांचे धाबे दणाणले आहेत.

भाऊसाहेब उत्तम चव्हाण (वय ३६, रा. सोयगाव, मालेगाव) आणि न्हानू भगवान जाधव (वय २४, रा. जैताणे, ता. साक्री) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

  • असा लावला सापळा

कॅम्प पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना, सहायक पोलीस निरीक्षक श्री. दिपक पाटील यांना २४ जुलै रोजी एका गुप्त खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की, एक सराईत चोरटा डी. के. चौकात चोरीची मोटारसायकल विकण्यासाठी येणार आहे. या माहितीच्या आधारे श्री. पाटील यांनी आपल्या पथकाला सापळा रचण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी डी. के. चौकात अत्यंत शिताफीने सापळा रचून संशयित भाऊसाहेब चव्हाण याला ताब्यात घेतले. त्याच्याकडील स्प्लेंडर प्लस मोटारसायकलीबद्दल विचारपूस केली असता, त्याने सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, पोलिसांनी खाक्या दाखवताच तो पोपटासारखा बोलू लागला आणि ती मोटारसायकल चोरीची असल्याची कबुली दिली. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता, पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

  • चौकशीत उघड झाले मोठे रॅकेट

पोलीस कोठडीत केलेल्या कसून चौकशीत भाऊसाहेब चव्हाण याने मालेगाव शहर आणि परिसरातून तब्बल २२ मोटारसायकली चोरल्याची धक्कादायक कबुली दिली. यापैकी १२ दुचाकी त्याने दोन वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवल्या होत्या, तर १० दुचाकी त्याचा साथीदार न्हानू जाधव याला विकल्याचे सांगितले. या माहितीवरून पोलिसांनी भाऊसाहेब चव्हाणकडून १२ आणि त्याचा साथीदार न्हानू जाधवला अटक करून त्याच्याकडून १० अशा एकूण २२ दुचाकी जप्त केल्या. गुन्ह्याच्या सुरुवातीला जप्त केलेली एक मोटारसायकल मिळून एकूण २३ मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.

 

ही धडाकेबाज कारवाई पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. तेगबिर सिंग संधु, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. सुरज गुंजाळ आणि श्री. नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. दिपक पाटील यांच्या नेतृत्वात पोलीस हवालदार सचिन गोसावी, हितेश भामरे, रुपचंद पारधी, दिपक हेंबाडे, राजेंद्रसिंग राजपूत, पोलीस शिपाई हर्षल पवार, लखन पवार यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. गुन्ह्याचा अधिक तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक गुंजाळ करीत आहेत.

नागरिकांना आवाहन

ज्या नागरिकांच्या मोटारसायकली चोरीस गेल्या आहेत, त्यांनी मालेगाव कॅम्प पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. जप्त केलेल्या २३ दुचाकींची पाहणी करून, योग्य कागदपत्रे दाखवून आपली मोटारसायकल ताब्यात घ्यावी, असे आवाहन कॅम्प पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!