पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या पुढाकाराने समन्वय बैठक; पीडितांना मदत करण्यासाठी एकत्रितपणे काम करण्याचे निर्देश
लाल 🚨 दिवा नाशिक,दि.२६ :-शहरातील महिला आणि बालकांच्या सुरक्षेसंबंधीच्या समस्या अधिक प्रभावीपणे हाताळण्यासाठी पोलीस आयुक्तालय आणि महिला व बालविकास विभाग यांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार केला आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच पार पडलेल्या समन्वय बैठकीत दोन्ही विभागांनी परस्पर सहकार्याने काम करण्यावर भर दिला.
या बैठकीत महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि सहयोगी सदस्यांनी आपल्या कामकाजातील अडीअडचणी आणि समस्या पोलीस आयुक्तांसमोर मांडल्या. राष्ट्रीय महिला आयोगाच्या निर्देशांनुसार, पोलीस यंत्रणा आणि महिला बालविकास विभागाने परस्पर समन्वय साधून पीडितांच्या मदतीसाठी सक्रिय राहावे, अशा स्पष्ट सूचना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी यावेळी दिल्या.

यापुढे बोलताना ते म्हणाले, “भरोसा सेलमध्ये येणाऱ्या पीडित महिला आणि मुलींना केवळ कायदेशीर मदतच नव्हे, तर मानसिक आधार देणेही तितकेच महत्त्वाचे आहे. यासाठी अशासकीय सदस्यांनी नियमितपणे भरोसा सेलमध्ये उपस्थित राहून पीडितांना समुपदेशन करावे.” या सूचनेमुळे पीडितांना वेळीच योग्य मार्गदर्शन मिळण्यास मदत होणार आहे.
या महत्त्वपूर्ण बैठकीस सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) संदिप मिटके, पोलीस निरीक्षक आम्रपाली तायडे, सपोनि मोनालिया मोरे, सपोउनि आशा सोनवणे, मपोअं मनिषा दिकोंडा यांच्यासह विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

त्याचबरोबर, अॅड. अशोक पवार (अधीक्षक, मुलांचे निरीक्षण व बालगृह), उमाकांत जाधव (जिल्हा विधी सेवा प्राधिकरण), तेजस दळवी (नोडल अधिकारी, वनस्टॉप सेंटर), मनोज अत्रे (वात्सल्य वसतीगृह), स्वाती म्हस्के (मुलीचे बालगृह), राधिका धोंगडे (अधीक्षक), भारती गजगे (अधीक्षक, वात्सल्य वसतीगृह), रवि काकळीज (संरक्षण अधिकारी), अॅड. निता राठोड, डॉ. क्षमा अघोर, डॉ. प्रिती बुब, रिमता पाटील, डॉ. प्रमिला पवार, डॉ. आनंद पाटील (सर्व अशासकीय सदस्य), आणि मिनाक्षी मराठे (समुपदेशक, महिला हक्क संरक्षण समिती) यांचीही उपस्थिती होती. या बैठकीमुळे दोन्ही विभागांमधील समन्वय अधिक दृढ होऊन महिला व बालकांच्या सुरक्षेसंबंधीच्या कामाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.







