जय खरातच्या अटकेने गुन्हेगारी विश्वात खळबळ; नागरिकांना मोठा दिलासा.
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. २३:शहराला हादरवून सोडणाऱ्या फुलेनगर गोळीबार प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि पोलिसांच्या रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार जय संतोष खरात याला जेरबंद करण्यात पंचवटी पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाला अखेर यश आले आहे. हद्दपार असूनही शहरात घुसून दहशत माजवणाऱ्या जय खरातला अटक झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे, तर गुन्हेगारी विश्वात मोठी खळबळ उडाली आहे
थरारक घटना आणि पोलिसांचे आव्हान
दिनांक २२ जुलै रोजी फुलेनगरच्या मुंजाबा चौक परिसरात दोन गटांमध्ये जुन्या वैमनस्यातून तुफान राडा झाला होता. यावेळी दगडफेकीसोबतच जय खरात आणि त्याच्या साथीदारांनी थेट पिस्तुलातून गोळीबार करून संपूर्ण परिसरात दहशतीचे सावट निर्माण केले होते. दिवसाढवळ्या झालेल्या या गोळीबाराने पोलिसांच्या कार्यक्षमतेलाच खुले आव्हान दिले होते. घटनेनंतर पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी आरोपींना तात्काळ गजाआड करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, पंचवटी गुन्हे शोध पथकाने सूत्रे फिरवत आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. पथकाचे धाडसी पोलीस शिपाई अंकुश काळे यांना त्यांच्या गुप्त खबऱ्यामार्फत जय खरात फुलेनगर परिसरात येणार असल्याची पक्की माहिती मिळाली. क्षणाचाही विलंब न लावता, पथकाने अत्यंत नियोजनबद्ध सापळा रचला आणि परिसरात येताच जय खरातच्या मुसक्या आवळल्या. त्याच्या चौकशीतून या गुन्ह्यात सामील असलेल्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही ताब्यात घेण्यात आले आहे.
जय खरात हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, दरोडा, मारामारी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगण्याचे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याला शहरातून हद्दपार केले असतानाही तो पुन्हा शहरात गुन्हेगारी कारवाया करत होता.
पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, उपआयुक्त श्रीमती. मोनिका राऊत, सहा. आयुक्त श्रीमती संगिता निकम आणि वपोनि. गजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सपोनि. सतिश शिरसाठ आणि त्यांच्या संपूर्ण टीमने ही कौतुकास्पद कामगिरी पार पाडली आहे. या प्रकरणातील इतर फरार आरोपींचा शोध सुरू असून त्यांनाही लवकरच बेड्या ठोकल्या जातील, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.







