२०० रुपयांचा पास १००० रुपयांना विकून हजारो भाविकांना गंडा; पोलिसांच्या तपासात मोठे रॅकेट उघड
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२५:-त्रंबकेश्वर:
ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या हजारो भाविकांच्या श्रद्धेशी खेळत, त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा त्रंबकेश्वर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. बनावट नावे आणि ओळखपत्रांच्या आधारे मोठ्या प्रमाणात ऑनलाईन दर्शन पास मिळवून त्याचा काळाबाजार करणाऱ्या पाच जणांच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. या टोळीने आतापर्यंत तब्बल ५,००० भाविकांना गंडा घातल्याचे पोलीस तपासात उघड झाले असून, या घटनेने त्र्यंबकनगरीत खळबळ उडाली आहे.
त्रंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी मोफत आणि २०० रुपये देणगी पास अशा दोन रांगांची सोय आहे. याच देणगी पासच्या ऑनलाईन बुकिंग प्रणालीतील त्रुटींचा फायदा उचलत ही टोळी कार्यरत होती. मागील काही दिवसांपासून माध्यमांमध्ये या काळाबाजाराविषयी बातम्या प्रसिद्ध होत होत्या. याची गंभीर दखल नाशिकचे पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील आणि मंदिराचे पदसिद्ध अध्यक्ष, अतिरिक्त सत्र न्यायाधीश श्री. सचिन भन्साळी यांनी घेतली. त्यांच्या कडक आदेशानंतर त्रंबकेश्वर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून त्रंबकेश्वर परिसरातून पाच संशयितांना ताब्यात घेतले. त्यांच्या मोबाईल फोन आणि ईमेलची तपासणी केली असता, धक्कादायक माहिती समोर आली. हे पाचही जण बनावट नावे, पत्ते आणि खोट्या ओळखपत्रांचा वापर करून शेकडो ऑनलाईन पास बुक करत होते. त्यानंतर, दर्शनासाठी आलेल्या गरजू भाविकांना हेरून २०० रुपयांचा अधिकृत पास तब्बल ७०० ते १,००० रुपये या चढ्या दराने विकून त्यांची लूट करत होते.
पोलिसांनी दिलेल्या तक्रारीवरून या पाचही जणांविरुद्ध संघटित गुन्हेगारीचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या तपासात या टोळीने तब्बल १,६४८ बनावट देणगी पास काढल्याचे आणि त्याद्वारे अंदाजे ५,००० भाविकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे:
१. दिलीप नाना झोले, रा. पेगलवाडी, त्रंबकेश्वर
२. सुदाम राजू बदादे, रा. पेगलवाडी, त्रंबकेश्वर
३. समाधान झुंबर चोथे, रा. रोकडवाडी, त्रंबकेश्वर
४. शिवराज दिनकर आहेर, रा. निरंजनी आखाडा जवळ, त्रंबकेश्वर
५. मनोहर मोहन शेवरे, रा. रोकडवाडी, त्रंबकेश्वर
या कारवाईमुळे मंदिराच्या ऑनलाईन पास प्रणालीतील गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत. या प्रणालीत तातडीने आवश्यक त्या सुधारणा करण्याचे आश्वासन मंदिर प्रशासनाने दिले आहे.
पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्रंबकेश्वर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. महेश कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा पुढील तपास पोलीस करत आहेत.







