तीन वर्षांपासून पोलिसांना देत होता गुंगारा; नाशिक ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेची पालघरमध्ये धडक कारवाई
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२८:-येवला, (प्रतिनिधी):येवल्यासह संपूर्ण नाशिक जिल्ह्याला हादरवून सोडणाऱ्या २९ कोटी रुपयांच्या जनता नागरी सहकारी पतसंस्था घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार, गेल्या तीन वर्षांपासून पोलिसांना सातत्याने हुलकावणी देणारा सराईत गुन्हेगार दौलतराव शंकरराव ठाकरे याच्या अखेर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे त्याला थेट पालघर जिल्ह्यातील बोईसर येथून अटक करण्यात आली असून, या कारवाईमुळे हजारो ठेवीदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
येवला येथील जनता नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन, व्हा. चेअरमन, संचालक मंडळ आणि व्यवस्थापकाने संगनमत करून एक महाकट रचला होता. ठेवी स्वीकारण्याची आर्थिक क्षमता नसतानाही, ठेवीदारांना जादा व्याजाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांच्या ठेवी गोळा केल्या. संगणकात खोट्या नोंदी करून आणि चुकीची आर्थिक पत्रके तयार करून त्यांनी तब्बल २९ कोटी २ लाख ४१ हजार ५३१ रुपयांचा गंडा घातला. मुदत संपल्यावर ठेवीदारांनी पैशांची मागणी केली असता, त्यांना रक्कम परत न देता त्यांची क्रूर फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी दि. ०७/११/२०२२ रोजी येवला शहर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ४२०, ४०६, ४०९, १२० (ब) आणि एमपीआयडी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्हा दाखल झाल्यापासून दौलतराव ठाकरे पोलिसांना चकवा देत फरार होता. नाशिक ग्रामीणचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपींना कोणत्याही परिस्थितीत शोधून काढण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर आणि श्री. तेगबीरसिंग संधु यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
पोलीस निरीक्षक श्री. राजू सुर्वे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुप्त बातमीदारांचे जाळे आणि अत्याधुनिक तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ठाकरे याचा माग काढला. तो आपली ओळख लपवून बोईसर, जि. पालघर येथे राहत असल्याची पक्की खबर मिळताच, पथकाने सापळा रचून त्याला झडप घालून ताब्यात घेतले.
गुन्ह्यांची मालिका आणि पोलीस कोठडी
दौलतराव ठाकरे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर येवला शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचे आणि एमपीआयडी कायद्याअंतर्गत तब्बल सहा गुन्हे दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांमध्ये तो फरार होता. त्याच्या अटकेमुळे या घोटाळ्यातील अनेक छुपे दुवे समोर येण्याची शक्यता आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता, मा. न्यायालयाने त्याला ३० ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, पोलीस कसून चौकशी करत आहेत.
या यशस्वी कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. राजू सुर्वे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे (प्रविण मासुळे, कैलास काकड, मोहन पवार, हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम) कौतुक केले आहे.







