१२ दिवसांत पैसे दुप्पट करण्याचे आमिष, नाशिकमध्ये कोट्यवधींच्या ऑनलाईन फसवणुकीचे रॅकेट उद्ध्वस्त!

ओपन हॅन्ड्स’ नावाच्या वेबसाईटद्वारे हजारो नागरिकांना गंडा; सूत्रधारांसह तिघांना सायबर पोलिसांच्या मुसक्या, दोन अद्याप फरार!

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ०२ ऑगस्ट: अवघ्या १२ ते १४ दिवसांत गुंतवलेली रक्कम दुप्पट करून देण्याच्या भूलथापांना बळी पडून हजारो नागरिकांना तब्बल एक कोटी रुपयांचा गंडा घालणाऱ्या एका मोठ्या ऑनलाईन फसवणूक रॅकेटचा नाशिक शहर सायबर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. ‘ओपन हॅन्ड्स’ या वेबसाईटच्या माध्यमातून हा महाघोटाळा चालवणाऱ्या टोळीतील तिघांना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधारांसह दोघे जण फरार आहेत. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

 

याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई कल्पेश कैलास पाटील यांनी शासनाच्या वतीने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी शिंदे (रा. मालेगाव), संदीप मत्साळकर (रा. इंदिरानगर, नाशिक), विष्णु मुरलीधर पाटील (वय ५०, रा. मालेगाव), प्रमोद बाबुलाल बिल्लाडे (वय ४१, रा. इंदिरानगर, नाशिक) आणि चेतन संजय महाजन (वय ३६, रा. देवळा) या पाच जणांनी संगनमत करून हा घोटाळा रचला.

अशी होती फसवणुकीची पद्धत:

आरोपींनी ‘ओपन हॅन्ड्स’ (Open Hands) नावाची एक वेबसाईट तयार केली होती. यासाठी त्यांनी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा इतर कोणत्याही शासकीय प्राधिकरणाची परवानगी घेतली नव्हती. या वेबसाईटच्या प्रचारासाठी ते झूम मीटिंग आणि विविध शहरांमध्ये प्रत्यक्ष बैठका घेत असत. या बैठकांमध्ये, नागरिकांना फक्त १२ ते १४ दिवसांत गुंतवलेली रक्कम दुप्पट करण्याचे आमिष दाखवले जात होते.

या योजनेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना १००० रुपये किमतीची एक ‘पिन’ विकत घ्यावी लागत होती. या टोळीने अशा प्रकारे तब्बल दहा हजार नागरिकांना या पिन विकून आणि सुमारे २५,००० व्यवहारांमधून अंदाजे एक कोटी रुपयांची रक्कम जमवली. ही सर्व रक्कम त्यांनी नागरिकांना कोणताही परतावा न देता स्वतःच्या फायद्यासाठी वापरून त्यांची फसवणूक करण्याचा प्रयत्न केला.

सायबर पोलिसांची धडक कारवाई:

या ऑनलाईन योजनेची माहिती मिळताच नाशिक सायबर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरली. पोलिसांनी अत्यंत गोपनीय पद्धतीने माहिती काढून दि. ०२ ऑगस्ट २०२५ रोजी पहाटे १:५४ वाजता छापा टाकत आरोपी विष्णु पाटील, प्रमोद बिल्लाडे आणि चेतन महाजन या तिघांना अटक केली. मुख्य सूत्रधार मानले जाणारे विकी शिंदे आणि संदीप मत्साळकर हे मात्र फरार होण्यात यशस्वी झाले असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१६(२), ६१(२), ६२ सह महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंधाचे रक्षण अधिनियम (MPID) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईने झटपट श्रीमंतीच्या नादात अशा योजनांमध्ये पैसे गुंतवणाऱ्यांना मोठा धडा मिळाला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक ढवळे यांच्या नेतृत्वाखालील पथक या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!