- • श्रीरामपुरात गोळीबार करून पळणारे सराईत गुन्हेगार चहेडी नाक्यावर जेरबंद!
- • अहिल्यानगर आणि नाशिक पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’ला अवघ्या काही तासांत यश!
- • कर्तव्यतत्परतेचे उत्तम उदाहरण; पोलीस आयुक्तांकडून गुन्हे शोध पथकाला शाब्बासकीची थाप!
लाल 🚨 दिवा-नाशिकरोड, दि. ३ जुलै २०२६:एकीकडे विठ्ठल नामाचा गजर, लाखो भाविकांची माउलींच्या पालखीसाठी लागलेली अथांग गर्दी आणि दुसरीकडे याच गर्दीचा फायदा घेऊन पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेले दोन सराईत गुन्हेगार! परंतु, गुन्हेगारांच्या प्रत्येक चालीवर मात करत नाशिकरोड पोलीस आणि अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखा (LCB) यांनी संयुक्तपणे एक अत्यंत थरारक आणि धाडसी मोहीम फत्ते केली आहे. श्रीरामपूर येथे भरदिवसा एका तरुणावर गोळीबार करून पळून जाणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने मोठ्या शिताफीने बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या ‘सिंघम’ स्टाईल कामगिरीमुळे संपूर्ण परिसरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
दि. २ जुलै २०२६ रोजी दुपारच्या सुमारास श्रीरामपूर (अहिल्यानगर) येथे जुन्या वादातून शुभम यादव या तरुणावर आरोपी अक्षय किरण कपोते आणि अभय सुरेश ससाने यांनी गोळीबार केला होता. या घटनेमुळे श्रीरामपूर परिसरात एकच खळबळ उडाली होती. जखमी शुभमवर उपचार सुरू असतानाच, हे दोन्ही आरोपी नाशिकच्या दिशेने पळून गेल्याची खात्रीशीर माहिती अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे आणि पोलीस उपनिरीक्षक महादेव गुठ्ठे यांना मिळाली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्याशी संपर्क साधून संशयितांचे फोटो व्हॉट्सॲपवर पाठवले.
पालखी सोहळा आणि पोलिसांचे चक्रव्यूह!
त्यावेळी नाशिक-पुणे हायवेवरील चहेडी जकात नाका येथे श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचा कडक बंदोबस्त सुरू होता. लाखो भाविकांच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर असतानाच पोलिसांसमोर हे मोठे आव्हान आले. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे व पोलीस निरीक्षक अतुल चौधरी (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी आणि त्यांच्या टीमने (पोलीस हवालदार विशाल पाटील, सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे, योगेश रानडे) चहेडी नाक्यावर सापळा रचला.
पल्सरवरून चेहरे लपवून येत होते, पण…
पालखी बंदोबस्तात डोळ्यात तेल घालून काम करत असतानाच, पोलिसांना एका पल्सर मोटारसायकलवरून दोन तरुण संशयास्पद रितीने चेहरे लपवून नाशिकच्या दिशेने येताना दिसले. पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेने त्यांना ओळखले. पोलिसांनी त्यांना थांबवण्याचा इशारा केला असता, आरोपींनी मोटारसायकल सुसाट पळवून पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्न केला.
परंतु, दबा धरून बसलेल्या गुन्हे शोध पथकाने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, बिबट्यासारखी झेप घेत या दोन्ही खतरनाक गुन्हेगारांना जागेवरच शिताफीने झडप घालून ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता, ते श्रीरामपूर गोळीबार प्रकरणातील मुख्य संशयित अक्षय कपोते आणि अभय ससानेच असल्याचे निष्पन्न झाले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, पालखी बंदोबस्ताचे कर्तव्य बजावत असताना केवळ काही तासांच्या आत या अट्टल गुन्हेगारांना जेरबंद करून नाशिकरोड पोलिसांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा मान राखला आहे. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस आयुक्त मा. श्री. संदीप कर्णिक साहेब, पोलीस उप आयुक्त मा. श्री. किशोर काळे साहेब आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती अद्विता शिंदे यांनी नाशिकरोड पोलिसांच्या संपूर्ण पथकाची पाठ थोपटून त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
आरोपींना पुढील कारवाईसाठी अहिल्यानगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून, या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की— “गुन्हेगार कितीही हुशार असला, तरी कायद्याचे हात त्याच्यापर्यंत पोहोचतातच!”






