लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१:-विशेष प्रतिनिधी विलोळी परिसरातील बेकायदेशीर ब्लास्टिंग आणि दोन राष्ट्रीय पक्षी मोरांच्या मृत्यूनंतर नाशिककरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत असतानाच, आता या प्रकरणात अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद माहिती समोर आली आहे. गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी मृत मोरांना एका ‘फोर्ड’ कंपनीच्या कारच्या डिक्कीत टाकून त्यांची परस्पर विल्हेवाट लावण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या नवीन खुलाशामुळे वरुण कन्स्ट्रक्शनच्या मालकांचे धाबे दणाणले असून, “या प्रकरणात वन विभाग आणि पोलीस खरंच तपास करणार का?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.
पुरावे मिटवण्याचा ‘हा’ कारस्थान उघड!
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शक्तिशाली ब्लास्टिंगमुळे मोरांचा मृत्यू झाल्यानंतर घटनास्थळी मोठी खळबळबळ उडाली होती. हे प्रकरण अंगलट येईल या भीतीने वरुण कन्स्ट्रक्शनच्या काही कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली केल्या. तिथे उभ्या असलेल्या एका फोर्ड कंपनीच्या आलिशान गाडीची डिक्की उघडून, त्यात अत्यंत क्रूरपणे मृत मोरांना कोंबण्यात आले आणि गाडी तात्काळ तिथून रवाना झाली. वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार हा अत्यंत गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा असताना, थेट पुरावेच नष्ट करण्याचा हा प्रकार नाशिक हादरवून टाकणारा आहे.
ती फोर्ड गाडी नक्की कोणाची? सीसीटीव्ही फुटेज तपासणार का?
या संपूर्ण काळ्या कारभारात वापरण्यात आलेली फोर्ड गाडी नेमकी कोणाची होती? ती बिल्डरची होती की अधिकाऱ्यांना मॅनेज करणाऱ्या दलालाची? घटना घडली त्या विलोळी नाका, सीएनजी पंप आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासल्यास या गाडीचा नंबर आणि त्यातील संशयित आरोपी सहज समोर येऊ शकतात. मात्र, सुरुवातीलाच उडवाउडवीची उत्तरे देणारे पोलीस आता तरी या गाडीचा माग काढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
वन्यजीव गुन्हे अन्वेषण विभाग ढिम्म का?
राष्ट्रीय पक्षी मोराची शिकार किंवा त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरणे हा कायद्यानुसार वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ च्या कलम ९ आणि ५१ अंतर्गत गंभीर गुन्हा आहे. यात सात वर्षांपर्यंतच्या कैदेची तरतूद आहे. असे असतानाही वन विभागाने अद्याप संशयित फोर्ड गाडी जप्त का केली नाही? आरोपी मोकळे कसे फिरत आहेत?






