संत नामदेव मंदिर जीर्णोद्धाराची मुख्यमंत्र्यांची घोषणा, आरोग्य-शिक्षण योजनांना चालना, तर उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची तयारी सुरू
लाल 🚨 दिवा -राज्य वार्ता मुंबई, दि. २३
- उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक प्रक्रिया सुरू, आयोगाकडून तयारीला वेग
- घटनेच्या अनुच्छेद ३२४ अंतर्गत निवडणूक आयोगाने आयोजन सुरू केले
नवी दिल्ली : भारताचे उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यानंतर, भारत निवडणूक आयोगाने घटनेच्या अनुच्छेद ३२४ अंतर्गत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे आयोजन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. गृह मंत्रालयाने २२ जुलै २०२५ रोजीच्या राजपत्र अधिसूचनेद्वारे यास अधिकृत मान्यता दिली आहे.या निवडणुकीचे आयोजन ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा, १९५२’ आणि ‘राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक नियमावली, १९७४’ च्या अधीन राहून केले जाते.
उपराष्ट्रपतीपदाच्या २०२५ मधील निवडणुकीसाठी आयोगाने आवश्यक तयारीस आरंभ केला आहे. या निवडणुकीसाठी लोकसभा व राज्यसभेतील निवडून आलेले आणि नामनिर्देशित सदस्य यांचा समावेश असलेल्या निर्वाचक मंडळाची तयारी, मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक करणे यासारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेचा यात समावेश आहे. ही प्रारंभिक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच निवडणुकीच्या वेळापत्रकाची अधिकृत घोषणा करण्यात येईल, असे भारत निवडणूक आयोगाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.
- संत नामदेव महाराज मंदिराचा जीर्णोद्धार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
- संत नामदेवांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार; पंढरपुरात 675 वा संजीवन समाधी सोहळा संपन्न
पंढरपूर, दि. २३ : समाजातल्या शेवटच्या व्यक्तीला मुख्य प्रवाहात आणणाऱ्या आणि भागवत धर्माचा विचार आपल्या लेखणी व वाणीने देशभर पोहोचविणाऱ्या संत नामदेव महाराज यांच्या पंढरपूर येथील मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. पंढरपूर येथे आयोजित श्री संत शिरोमणी नामदेव महाराज, परिवार व संत जनाबाई यांच्या 675 व्या संजीवन समाधी सोहळा कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, संत नामदेव महाराजांच्या समाधीस्थळी वैश्विक दर्जाचे स्मारक उभारताना निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. त्यांचे विचार हे त्यांचे खरे स्मारक असून, हे विचार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येतील. त्यांनी भाषेचे बंधन झुगारले, सीमांची कुंपणे तोडली आणि भक्तीचा ओघ संपूर्ण भारतात नेण्याचे महान कार्य केले.
यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
- मुख्यमंत्र्यांच्या हस्ते महाआरती आणि दर्शन
कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री संत नामदेव महाराज पायरीचे दर्शन घेतले. त्यांच्या हस्ते पायरीचे विधिवत पूजन करून महाआरती करण्यात आली. तसेच, श्री संत चोखामेळा समाधीचे व श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचे दर्शनही मुख्यमंत्र्यांनी घेतले.
- मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय आणि सूचना
रुग्णालयांनी गरजू रुग्णांना योजनांचा लाभ प्रभावीपणे द्यावा – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. २३ : धर्मादाय संस्थांच्या कायद्यांतर्गत नोंदणीकृत रुग्णालयांनी आयुष्मान भारत आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनांचा गरजू रुग्णांना प्रभावीपणे लाभ द्यावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. पुण्यातील यशदा येथे आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. धर्मादाय रुग्णालयांनी निर्धन व दुर्बल घटकांसाठी २० टक्के खाटा आरक्षित करणे बंधनकारक असल्याचेही त्यांनी सांगितले.
- राज्य कामगार विमा योजनेचा लाभ गरजू कामगारांपर्यंत पोहोचवा – मंत्री प्रकाश आबिटकर
मुंबई, दि. २३ : राज्य कामगार विमा योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या सुविधांचा लाभ तळागाळातील गरजू कामगारांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत त्यांनी ‘एमआयडीसी’ मधील कंपन्यांनी कामगारांच्या विमा नोंदणीसाठी शिबिरे आयोजित करावीत, असे सांगितले.
- राज्यात ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्र’ स्थापन करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील
मुंबई, दि. २३ : ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना तांत्रिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत सुलभता यावी यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील दोन नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये ‘विद्यार्थी सहाय्यता केंद्रे’ स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. ही केंद्रे विद्यार्थ्यांना अर्ज प्रक्रिया, कागदपत्रांची तपासणी आणि समुपदेशनासाठी मदत करतील.
- वक्फ मंडळाच्या मालमत्तेवरील अतिक्रमणाबाबत अहवाल सादर करा – मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. २३ : परभणीसह राज्यातील वक्फ मंडळाच्या मालमत्तेवर होत असलेल्या अतिक्रमणांच्या तक्रारींची चौकशी करून तातडीने अहवाल सादर करण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत. वक्फ मंडळाच्या जागांवर अतिक्रमण आढळल्यास प्रत्यक्ष पाहणी करून योग्य ती कारवाई करावी, असेही ते म्हणाले.
- प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमाच्या कामांना गती द्या – मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. २३ : प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक बहुल क्षेत्रातील विकास कामांना गती देण्याचे निर्देश अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. वितरित केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र तातडीने सादर करून पुढील निधी उपलब्ध करून घ्यावा, अशा सूचना त्यांनी जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांना दिल्या.
- खेळाडूंना अधिक सुविधांसाठी निधी व्यवस्थापनात संगणकीय तंत्रज्ञानाचा वापर – क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे
मुंबई, दि. २३ : राज्यातील खेळाडूंना अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी क्रीडा विभागाच्या निधीचे पारदर्शक व्यवस्थापन करण्यासाठी संगणकीय तंत्रज्ञान आधारित प्रणालीचा अवलंब करण्याचे निर्देश क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले. यामुळे निधीचा प्रभावी वापर होऊन जास्तीत जास्त खेळाडूंपर्यंत सुविधा पोहोचतील, असे ते म्हणाले.
राष्ट्रीय घडामोडी
- बिहारमधील मतदार याद्यांच्या पुनरिक्षण प्रक्रियेला वेग
कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही, निवडणूक आयोगाचा उद्देश
मुंबई, दि.२३ : भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे की, बिहार राज्यात २४ जून २०२५ पासून सुरू झालेल्या विशेष पुनरिक्षण मोहिमेच्या पहिल्या टप्प्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या मोहिमेत २० लाख मृत मतदार, २८ लाख स्थलांतरित मतदार आणि ७ लाख दुबार नोंदणी झालेले मतदार वगळण्यात आले आहेत. कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही आणि कोणताही अपात्र व्यक्ती समाविष्ट होणार नाही, हा आयोगाचा उद्देश आहे. १ ऑगस्ट २०२५ रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल आणि त्यावर १ सप्टेंबर २०२५ पर्यंत हरक








