खाकीचा थरारक दणका! नाशिकमध्ये बंद घरे लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; अंबड पोलिसांकडून ८.२ लाखांच्या सोन्यासह अट्टल चोरटे गजाआड!

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२५:-(विशेष प्रतिनिधी):नाशिक शहरात घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र चालवून नागरिकांची झोप उडवणाऱ्या गुन्हेगारांवर नाशिक पोलिसांनी अखेर ‘सर्जिकल स्ट्राईक’ केला आहे! मा. पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांच्या थेट मार्गदर्शनाखाली, अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने केवळ गुन्हे उघडकीस आणले नाहीत, तर तब्बल ८,२०,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करून गुन्हेगारांचे कंबरडे मोडले आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण परिसरातून खाकी वर्दीवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

गुप्त बातमीदाराचे जाळे अन् पोलिसांचा थरारक सापळा!

कामठवाडे शिवार येथील स्वाती मुत्रक यांच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरांनी सोन्याची पोत आणि रोकड लांबवली होती. या धाडसी चोऱ्यानंतर अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाचे अंमलदार अनिल गाढवे यांनी तात्काळ आपली चक्रे फिरवली. एका गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे, सोन्याची विक्री करण्यासाठी आलेल्या संशयित राहुल धनराज बडगुजर (वय ३६) याला पोलिसांनी इंदिरानगर भागात फिल्मी स्टाईलने सापळा रचून ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने पोतेभर सोन्याची लगड आणि कॅशसह ५,१९,४३६/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या स्वाधीन केला! चौकशीदरम्यान त्याने डी. जी. पी. नगर येथील आणखी एका घरफोडीची कबुली दिली.

महिला आरोपीसह भाऊही जेरबंद!

दुसऱ्या एका धडक कारवाईत, हर्षल कुमट यांच्या घरातून सोन्याची चेन चोरणारी महिला आरोपी नंदिनी दिनेश हानवते (वय २६) हिच्या मुसक्या आवळण्यात पोलीस शिपाई वैभव एखंडे यांना यश आले. पोलिसांनी तपास करत नंदिनी आणि तिचा मावस भाऊ संतोष कांबळे या दोघांनाही अटक केली असून, त्यांच्याकडून ३,००,०००/- रुपये किमतीची सोन्याची चेन हस्तगत करण्यात आली आहे.

कर्तव्यदक्ष पोलिसांना नाशिककरांचा सलाम!

अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली सपोनि विलास पडोळकर, योगेश देसले आणि संपूर्ण गुन्हे शोध पथकाने जीवाची बाजी लावून ही कामगिरी केली आहे. नाशिक पोलिसांच्या या ‘सुपरफास्ट’ कामगिरीमुळे नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे!

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!