अखिल भारतीय संत समितीच्या अधिवेशनात सर्व संप्रदायांच्या संत-महंतांची एकमुखी मागणी; गोहत्या बंदी कायद्यासाठी सरकारला साद, कुंभमेळ्याच्या तयारीवर चिंता व्यक्त.
लाल 🚨 दिवा-भिवंडी, दि. ५ (आपला प्रतिनिधी) –धर्मरक्षणासाठी जमलेल्या संत-महंतांच्या महासागराने आणि त्यांच्या ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने आज भिवंडी नगरी अक्षरशः दुमदुमून गेली. भगव्या पताका, तेजस्वी चेहऱ्यांचे साधू-संत आणि सनातन धर्मावरील अढळ श्रद्धेने भारलेल्या या वातावरणात, अखिल भारतीय संत समितीचे महाराष्ट्र प्रदेश अधिवेशन मोठ्या उत्साहात आणि यशस्वीरीत्या संपन्न झाले. या अधिवेशनाने केवळ धार्मिक एकजुटीचे दर्शन घडवले नाही, तर केंद्र आणि राज्य सरकारपुढे काही महत्त्वपूर्ण आणि ठोस मागण्यांचे रणशिंगही फुंकले.
या ऐतिहासिक अधिवेशनासाठी संरक्षक जगद्गुरु रामानंदाचार्य माऊली सरकार महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती महाराज व संयुक्त राष्ट्रीय महामंत्री महामंडलेश्वर मनमोहन दास महाराज राधे राधे बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली हा संतसागर उसळला होता.
या धर्ममंचावर प्रदेश महामंत्री स्वामी भारत आनंद महाराज, प्रदेशाध्यक्ष गोपाल चैतन्य जी महाराज, कोषाध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरि महाराज, कोकण प्रांत सह मंत्री महंत शिवरूपानंद महाराज आणि संगठन मंत्री ह.भ.प. विश्वनाथ वारिंगे महाराज यांच्यासह महानुभाव पंथाचे सुदर्शन महाराज व सनातन धर्मातील सर्व १२७ संप्रदायांचे प्रमुख धर्माचार्य, महंत आणि धर्मरक्षक एकत्र आले होते, जे या ऐतिहासिक एकजुटीचे प्रतीक ठरले.
‘हिंदु राष्ट्र’ घोषणेसाठी एकमुखी पाठिंबा
या अधिवेशनाचा केंद्रबिंदू ठरला तो म्हणजे प्रदेश प्रमुख श्री महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांनी मांडलेला भारताला ‘हिंदु राष्ट्र’ घोषित करण्याचा ठराव. जेव्हा त्यांनी ही मागणी केली, तेव्हा उपस्थित सर्व संत-महंतांनी दोन्ही हात उंचावून आणि जय श्रीरामच्या घोषणेने या मागणीला प्रचंड समर्थन दिले. “भारत मूळचा हिंदु राष्ट्र आहे, केवळ घटनात्मक घोषणेची आवश्यकता आहे,” असे महंत अनिकेतशास्त्री महाराज म्हणाले.
गोहत्या बंदी कायद्यासाठी आर्त साद
“गाईला आम्ही माता मानतो आणि आमच्याच देशात तिची खुलेआम कत्तल होते, हे आता सहन केले जाणार नाही,” अशा तीव्र शब्दांत अनेक संतांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. संपूर्ण भारत देशात तात्काळ कोणताही विलंब न लावता ‘गो हत्या बंदी’ कायदा लागू करावा, ही केवळ मागणी नसून समस्त साधु-संतांच्या हृदयातील आर्त किंकाळी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
संत सुरक्षा आणि कुंभमेळ्यावर चिंता
देशभरात साधु-संतांवर होणारे हल्ले आणि त्यांच्या सुरक्षेचा मुद्दाही यावेळी ऐरणीवर आला. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. त्याचबरोबर, आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर महाकुंभाची तयारी अद्याप सुरू न झाल्याने संतांनी तीव्र चिंता व्यक्त केली. “कुंभमेळा हा सनातन परंपरेचा मानबिंदू आहे, त्याच्या आयोजनात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही,” असा स्पष्ट इशाराही देण्यात आला.
‘आपल्या’ सरकारकडून मोठ्या अपेक्षा
केंद्र आणि राज्यात सत्तेवर असलेले हिंदुत्वनिष्ठ सरकार हे ‘आपले सरकार’ आहे, अशी भावना बहुतांश संतांनी व्यक्त केली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून आम्हाला मोठ्या अपेक्षा आहेत. संतांनी केलेल्या मागण्या हे सरकार निश्चितच पूर्ण करेल,” असा दृढ विश्वास राष्ट्रीय महामंत्री स्वामी जितेंद्रानंद सरस्वती महाराज यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला.
एकंदरीत, भिवंडीच्या या धर्ममंचाहून उठलेला ‘हिंदु राष्ट्रा’चा आणि ‘गोहत्या बंदी’चा बुलंद आवाज दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचेल आणि सरकार यावर तातडीने कार्यवाही करेल, असा दृढ विश्वास सर्व संतांनी व्यक्त करत या अधिवेशनाचा समारोप केला.







