लाल 🚨 दिवा-श्रीगोंदा, अहिल्यानगर,दी.९ : शासकीय सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही लाचखोरीची सवय जात नाही, याचाच प्रत्यय श्रीगोंदा तालुक्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातून कनिष्ठ अभियंता म्हणून सेवानिवृत्त झालेल्या एका ‘लोकसेवकाने’ ठेकेदाराच्या कामाचा अहवाल देण्यासाठी चक्क ७ हजार रुपयांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) अत्यंत शिताफीने केलेल्या कारवाईत या निवृत्त अभियंत्याचा भ्रष्ट चेहरा समोर आला असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील तक्रारदार हे एक व्यावसायिक ठेकेदार असून, त्यांनी श्रीगोंदा तालुक्यात जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत येणाऱ्या रस्ता मजबुतीकरण आणि डांबरीकरणाची दोन कामे केली होती. नियमानुसार, या कामांची बिले मंजूर होण्यासाठी राज्य गुणवत्ता निरीक्षण (SQM) विभागाचा अहवाल आवश्यक असतो. हा अहवाल मिळवून देण्याच्या बदल्यात जिल्हा परिषदेचे सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता, वर्ग-३, प्रकाश निवृत्ती पाचनकर (वय ५८) याने ठेकेदाराकडे लाचेची मागणी केली.
पाचनकर याने पुणे येथील गुणवत्ता निरीक्षक श्री. आर. एस. देशमुख यांच्याकडून अहवाल मिळवून देतो, असे सांगून प्रत्येक कामासाठी ३,५०० रुपये, याप्रमाणे दोन्ही कामांचे मिळून एकूण ७,००० रुपयांची मागणी केली. पैसे दिल्याशिवाय अहवाल मिळणार नाही आणि तुमची बिले अडकून पडतील, असेही त्याने तक्रारदाराला अप्रत्यक्षपणे सुचवले होते.
पाचनकरच्या या त्रासाला कंटाळून आणि भ्रष्टाचाराला पाठिंबा न देण्याचा निर्धार करून ठेकेदाराने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अहिल्यानगर कार्यालय गाठले. १६ एप्रिल २०२५ रोजी त्यांनी रीतसर तक्रार दाखल केली. तक्रारीचे गांभीर्य ओळखून नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक मा. श्री. भारत तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगरच्या पथकाने तात्काळ हालचाल केली.
पोलीस निरीक्षक श्रीमती देवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने त्याच दिवशी, म्हणजेच १६ एप्रिल २०२५ रोजी सापळा रचून लाच मागणीची पडताळणी केली. यावेळी, आरोपी प्रकाश पाचनकर याने तक्रारदाराकडे दोन्ही कामांसाठी ७,००० रुपयांच्या लाचेची स्पष्ट मागणी केली आणि ती रक्कम स्वीकारण्याची तयारीही दर्शवली. हा सबळ पुरावा मिळताच पथकाने पुढील कारवाई करत पाचनकर विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अन्वये गुन्हा (गुर.नं ८२१/२०२५) दाखल केला आहे.
या यशस्वी कारवाईत पोलीस उपअधीक्षक श्री. अजित त्रिपुटे यांच्या पर्यवेक्षणाखाली पोकों. सचिन सुदुक, गजानन गायकवाड आणि चालक दशरथ लाड यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सेवानिवृत्तीनंतरही शासकीय कामांमध्ये हस्तक्षेप करून लाच मागणाऱ्या या ‘लोकसेवका’च्या कृत्यामुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल-फ्री क्रमांक
१०६४ वर संपर्क साधावा, असे आवाहन ACB तर्फे करण्यात आले आहे.







