पोलिसांचा धाक संपला की काय? पंचवटीतील घटनेने ज्येष्ठ नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण; पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह.
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. १३ (वृत्तसंस्था):नाशिक शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघाल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. पोलिसांचा धाक गुन्हेगारांना उरला आहे की नाही, असा संतप्त सवाल विचारण्याची वेळ नाशिककरांवर आली आहे. पंचवटीतील हिरावाडीसारख्या गजबजलेल्या परिसरात, भर दुपारी चार अज्ञात भामट्यांनी ‘आम्ही पोलीस आहोत’ असे सांगून एका ७३ वर्षीय वृद्धेला लाखोंचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण शहरात, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, म्हसरूळ येथील रहिवासी असलेल्या रोहिणी सदानंद देऊसकर (वय ७३) या आज दुपारी १२ वाजेच्या सुमारास रिक्षामधून (क्र. एम.एच. १५, ई. एच. ०१६१) पंचवटीतील सावता नगर येथे जात होत्या. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या हेल्मेट घातलेल्या दोघांनी आणि त्यांच्या दोन पायी चालणाऱ्या साथीदारांनी त्यांची रिक्षा थांबवली.
“काल रात्री इथे एक खून झालाय, तुम्ही एवढे दागिने घालून का फिरता? पैसे आणि दागिने काढून ठेवा,” अशी धमकीवजा सूचना देत या भामट्यांनी श्रीमती देऊसकर यांना घाबरवले. त्यानंतर, “तुमच्या बांगड्या कागदात गुंडाळून ठेवा, साहेबांना दाखवायच्या आहेत,” असे सांगून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा बनाव केला. या अनपेक्षित प्रकाराने घाबरलेल्या श्रीमती देऊसकर यांनी आपल्या हातातील सुमारे ४० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या चार बांगड्या काढून दिल्या. या बांगड्या कागदात गुंडाळण्याचा बनाव करत क्षणात या टोळक्याने हातचलाखीने त्या लंपास केल्या आणि तेथून पसार झाले.
पोलिसांची केवळ ५० हजारांची नोंद, नागरिकांमध्ये आश्चर्य
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, फिर्यादीनुसार या सोन्याच्या बांगड्यांची किंमत तब्बल चार लाखांपेक्षा जास्त असताना, पंचवटी पोलिसांनी आपल्या गुन्हे नोंद वहीत (गुरनं ४३३/२०२५) केवळ ५० हजार रुपये किंमत नोंदवली आहे. गुन्ह्याची तीव्रता कमी दाखवण्याचा हा प्रकार आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, उपनिरीक्षक गायकवाड आणि पोलीस हवालदार संदीप गांगुर्डे यांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत गुन्हेगार पसार झाले होते. नेहमीप्रमाणेच, घटना घडल्यानंतर पोलिसांचे पथक पोहोचले, पण उपयोग काय? शहरात दिवसाढवळ्या ज्येष्ठ नागरिक लुटले जात असताना पोलिसांची गस्त नेमकी कुठे असते, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
या घटनेमुळे नाशिक शहर ज्येष्ठांसाठी किती असुरक्षित बनले आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तोतया पोलिसांची टोळी शहरात सक्रिय असूनही पोलीस प्रशासन त्यांना रोखण्यात अपयशी ठरत असल्याचे या घटनेतून स्पष्ट होत आहे. या टोळीला जेरबंद करण्याचे मोठे आव्हान आता पंचवटी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.







