नाशिकच्या राजकारणात मोठा भूकंप! वंचित बहुजन आघाडीला प्रचंड खिंडार; अविनाश शिंदेंचा हजारो कार्यकर्त्यांसह रिपब्लिकन सेनेत प्रवेश!

शिंदे यांच्यावर थेट जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी; महापालिका निवडणुकीच्या तोंडावर वंचितला मोठा धक्का!लालदिवानाशिक,दि.२३:प्रतिनिधीकडून:
आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. वंचित बहुजन आघाडीचे एक खंबीर आणि वजनदार नेते म्हणून ओळखले जाणारे, मानगराध्यक्ष अविनाश शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा देत पक्षाला ‘जय भीम’ केला आहे. इतकेच नव्हे, तर आपल्या हजारो समर्थकांसह त्यांनी आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील रिपब्लिकन सेनेचा झेंडा हाती घेतला आहे. या पक्षबदलामुळे वंचित बहुजन आघाडीला नाशिक जिल्ह्यात मोठे खिंडार पडले असून, राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

अविनाश शिंदे यांच्या पक्षप्रवेशानंतर लगेचच त्यांच्यावर रिपब्लिकन सेनेच्या जिल्हाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच सुनील साळवे (नाशिक महानगर प्रमुख), तुकाराम मोजाड (उपजिल्हाध्यक्ष) यांच्यासह शेकडो पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन सेनेत प्रवेश केला. यामुळे शहरात रिपब्लिकन सेनेला मोठे बळ मिळाले आहे.

  • राजकीय गणिते आणि पक्षबदलामागची कारणे

वंचित बहुजन आघाडीचे जाळे संपूर्ण जिल्ह्यात आणि महानगर क्षेत्रात विणण्यात अविनाश शिंदे यांचा सिंहाचा वाटा होता. त्यांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून पक्षाची ताकद वाढवली होती. महापालिका निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारांच्या मुलाखतींचा धडाकाही सुरू केला होता. असे असताना त्यांनी अचानक पक्ष सोडल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यामागे एक मोठे राजकीय समीकरण असल्याची चर्चा आहे. आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने नुकतीच

शिवसेना (शिंदे गट) सोबत युती केली आहे. या युतीनुसार, शिंदे गट रिपब्लिकन सेनेला १० टक्के जागा सोडणार आहे. नाशिकमध्येही हाच फॉर्म्युला लागू झाल्यास महापालिकेत सन्मानजनक जागा मिळवून शिरकाव करणे शक्य होईल, हीच अपेक्षा या पक्षबदलामागे असल्याचे बोलले जात आहे.

“आंबेडकरी जनतेच्या हितासाठीच निर्णय!” – अविनाश शिंदे

माध्यमांशी बोलताना अविनाश शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “आंबेडकरी विचारांच्या जनतेचे हित लक्षात घेऊनच मी हा निर्णय घेतला आहे. वंचित बहुजन आघाडीसाठी जिल्ह्यात उभी केलेली सर्व ताकद आता रिपब्लिकन सेनेसाठी वापरणार. आगामी महापालिका निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकून आणण्यासाठी आम्ही एक ठोस रणनीती आखू. सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लवकरच जिल्हा आणि महानगर कार्यकारिणी जाहीर केली जाईल, ज्यात सर्व घटकांना योग्य न्याय मिळेल.”

या पक्षबदलामुळे नाशिकमधील आंबेडकरी राजकारणाची समीकरणे पूर्णपणे बदलणार असून, आगामी महापालिका निवडणुकीत याचे पडसाद निश्चितच उमटतील, हे मात्र नक्की

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!