नायब तहसीलदारांच्या तक्रारीनंतर सरकारवाडा पोलिसांची धडक कारवाई; निवडणूक आयोगाची बदनामी आणि जनतेत भीती पसरवल्याचा गंभीर आरोप.
लाल 🚨 दिवा-नाशिक नाशिक, दि. २१:-ऑगस्ट (विशेष प्रतिनिधी):लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर, सोशल मीडियावरून एका धक्कादायक आणि खोट्या माहितीचा स्फोट झाल्याने नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. देवळाली मतदारसंघातील मतदारांची संख्या चुकीची दाखवून जनतेत संभ्रम आणि भीती निर्माण केल्याप्रकरणी, दिल्लीतील एका नामांकित राजकीय विश्लेषकावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार सौ. प्रविणा तडवी यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सरकारवाडा पोलिसांनी ही धडक कारवाई केली आहे.
घटनेची हकीकत अशी की, आरोपी श्री. संजय कुमार, जे स्वतःला CSDS (सेंटर फॉर द स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज), नवी दिल्ली येथील राजकीय विश्लेषक म्हणवतात, यांनी त्यांच्या ट्विटर (X) हँडलवरून देवळाली मतदारसंघाबद्दल एक अत्यंत स्फोटक आणि खोटी माहिती प्रसारित केली. ११ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३५ च्या सुमारास केलेल्या या ट्विटमध्ये त्यांनी दावा केला की, लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये देवळाली मतदारसंघात तब्बल ४,५६,०७२ मतदार होते, तर विधानसभा निवडणुकीसाठी ही संख्या २,८८,१४१ झाली, म्हणजेच तब्बल १,६७,९३१ मतदारांची (३६.८२%) घट झाली.
मात्र, ही आकडेवारी धादांत खोटी असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. तक्रारदार नायब तहसीलदार प्रविणा तडवी यांनी आपल्या फिर्यादीत स्पष्ट केले आहे की, प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीवेळी मतदारसंख्या केवळ २,७६,९०२ इतकीच होती. आरोपी संजय कुमार यांनी जाणीवपूर्वक आकडा फुगवून दाखवला आणि त्यानंतर मोठी घट झाल्याचे चित्र निर्माण केले. या प्रकारामुळे निवडणूक आयोगाची प्रतिमा मलीन करण्याचा आणि शासकीय प्रक्रियेबद्दल जनतेच्या मनात अविश्वास निर्माण करण्याचा हा एक सुनियोजित कट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
शासकीय यंत्रणेला बदनाम करण्याचा कट?
या खोट्या माहितीमुळे सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरून सार्वजनिक शांतता भंग होऊ शकते, असा गंभीर आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी, मुंबई यांच्या निर्देशांनुसार, तडवी यांना गुन्हा दाखल करण्याचे अधिकार देण्यात आले. यानंतर त्यांनी तातडीने सरकारवाडा पोलीस ठाणे गाठून श्री. संजय कुमार यांच्याविरोधात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून आरोपी संजय कुमार यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १७५ (निवडणुकीबाबत खोटी माहिती प्रसिद्ध करणे), कलम ३५३(१)(बी) (शासकीय कामात अडथळा), कलम २१२, ३४०(१), (२) आणि कलम ३५६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या घटनेमुळे सोशल मीडियाचा वापर करून निवडणुकांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शक्ती पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करत असून, यामागे आणखी कोण आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.







