गरिबांना बनवले ‘बनावट मालक’; नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांची भिवंडीत धडक कारवाई, २ मुख्य वकिलांसह १४ जणांचे रॅकेट बेड्यांमध्ये !
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१२:-:चित्रपटाच्या कथेलाही मागे टाकेल अशा एका हायटेक आणि अत्यंत डेंजरस भूखंड घोटाळ्याचा नाशिकच्या इंदिरानगर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे! चक्क मूळ मालकाच्या जागी हुबेहूब दिसणारा बनावट वृद्ध उभा करायचा, शासकीय राजपत्र (गॅझेट) बनावट तयार करून आधार कार्डावर नाव बदलायचे आणि बँक खाती उघडून कोट्यवधींचे भूखंड परस्पर लाटायचे, अशा भयंकर ‘क्राईम पॅटर्न’चा पोलिसांनी थरारक रितीने उलगडा केला आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असलेले दोन हायप्रोफाईल वकील जोडपे पोलिसांना गुंगारा देऊन फरार झाले होते, अखेर त्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे!
चेतनानगर येथील संतोष संजीवा हेगडे यांच्या मालकीचा ५०१ चौ. मीटरचा प्लॉट आणि वडाळा शिवारातील सुधीर जमनादास गुजराथी यांच्या मालकीचा १९० चौ. मीटरचा भूखंड हडपण्यासाठी या टोळीने अत्यंत पद्धतशीर कट रचला.
गुन्हेगारी डोके लढवून आरोपींनी चक्क ६५ वर्षीय रिक्षाचालक घनश्याम गिल याला ‘संतोष हेगडे’ बनवले, तर सुरतच्या ६८ वर्षीय बाबूभाई मुलतानी याला ‘सुधीर गुजराथी’ म्हणून उभे केले! यासाठी आरोपी वकिलांनी चक्क महाराष्ट्र शासनाचे बनावट ‘राजपत्र’ (गॅझेट) तयार करून आधार कार्ड अपडेट केले. त्या आधारे बनावट बँक खाती उघडून हे भूखंड दुसऱ्याला विकले आणि मूळ मालकासह खरेदीदाराचीही कोट्यवधींची फसवणूक केली.
पाच गुन्हे, करोडोंचा गंडा अन् भिवंडीतून अटक!
या टोळीने नाशिक शहरात अशाच प्रकारे तब्बल पाच गुन्हे करून करोडो रुपयांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हा दाखल होताच मुख्य संशयित वकील नाशिकमधून फरार झाले होते. मात्र, इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हेशोध (DB) पथकाने तांत्रिक विश्लेषण करत थेट भिवंडी (जि. ठाणे) गाठले आणि तिथून मुख्य आरोपी वकिलांना बेड्या ठोकल्या!
टोळीतील ‘हे’ आहेत एकूण १४ आरोपी:
1. ॲड. कपिल अरविंद पाठक (वय ३८, मुख्य सूत्रधार वकील, खोडेनगर, नाशिक)
2. ॲड. अलमास करीम सैय्यद (वय ३३, मुख्य सूत्रधार वकील, खोडेनगर, नाशिक)
3. रितेश रमेश संसारे (वय ४६, रा. वडगाव पंगु)
4. घनश्याम गजाराम गिल (वय ६५, बनावट संतोष हेगडे बनलेला रिक्षाचालक)
5. शोभा शंकर मुकणे (वय ६३, बनावट ज्योती हेगडे बनलेली महिला मजूर)
6. भिमराव कोंडीबा वाघमारे (वय ४४, रा. नवीन सिडको)
7. मुकेश प्रकाश जाधव (वय ३८, जमीन खरेदी-विक्री एजंट, सिडको)
8. रविंद्र हरिदास अडागळे (वय ४७, रा. देवळाली कॅम्प)
9. शरद भास्कर मुठेकर (वय ५१, ट्रॅव्हल्स व्यावसायिक, मखमलाबाद रोड)
10. बासीद करीम सैय्यद
11. नईम करीम सैय्यद
12. करीम शरफोद्दीन सैय्यद
13. फिरोजा करीम सैय्यद
14. बाबुभाई गुलाबभाई मुलतानी (वय ६८, बनावट सुधीर गुजराती बनलेला सुरतचा इसम)
या ‘सुपरकॉप्स’नी केला घोटाळ्याचा पर्दाफाश!
ही धडाकेबाज कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उप-आयुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सपोनि सुनील अंकोलीकर आणि तपासाधिकारी पोलीस उप-निरीक्षक संतोष फुंदे यांच्यासह अंमलदार पवन परदेशी, अमजद पटेल, सागर परदेशी, कुलदीप पवार, योगेश जाधव, सागर कोळी, अमोल कोथमिरे, सौरभ माळी, वाल्मिक पाटील, राहुल धोंगडे, प्रमोद कासुदे, दीपक शिंदे आणि महिला पोलीस अंमलदार शामल जोशी यांच्या पथकाने केली.
पोलीस आवाहन: अशा प्रकारे बनावट कागदपत्रांद्वारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी तात्काळ इंदिरानगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.






