क्षुल्लक वादातून दोन कुटुंबात पेटले टोळीयुद्ध; सणाच्या दिवशीच नांदूर नाका रक्ताने माखला, धोत्रे कुटुंबावर दुःखाचा डोंगर!
लाल 🚨 दिवा-नाशिक -दि.२९:-नांदूर नाका, आमच्या प्रतिनिधीकडून:पोळ्याच्या सणाच्या दिवशी नांदूर नाका परिसरात उसळलेल्या निमसे-धोत्रे कुटुंबातील वादाला अखेर रक्तरंजित आणि दुःखद वळण लागले आहे. जमावाच्या जीवघेण्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या राहुल संजय धोत्रे या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, क्षुल्लक वादातून एका तरुणाचा बळी गेल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोळ्याच्या दिवशी निमसे कुटुंबातील एका तरुणाला धोत्रे कुटुंबीयांनी मारहाण केल्याने या वादाची ठिणगी पडली होती. याचा वचपा काढण्यासाठी संतप्त निमसे कुटुंबीय आणि त्यांच्या समर्थकांनी मोठा जमाव जमवून धोत्रे कुटुंबीयांवर हल्ला चढवला. काठ्या, दगड आणि धारदार शस्त्रांनी सुसज्ज असलेल्या या जमावाने धोत्रे कुटुंबीयांना बेदम मारहाण केली.
या निर्दयी हल्ल्यात राहुल संजय धोत्रे याच्या डोक्याला आणि शरीरावर गंभीर जखमा झाल्या होत्या. त्याला रक्ताच्या थारोळ्यात तात्काळ एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
गेले काही तास राहुल मृत्यूशी झुंज देत होता. डॉक्टर त्याच्यावर शर्थीचे प्रयत्न करत होते, मात्र जखमा गंभीर असल्याने त्याची प्राणज्योत मालवली. राहुलच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरताच धोत्रे कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. एका तरुण मुलाचा जीव गेल्याने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
राहुलच्या मृत्यूने नांदूर नाका परिसरातील वातावरण अधिकच चिघळले आहे. परिसरात प्रचंड तणाव असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. याप्रकरणी आता खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पोलिसांनी हल्ल्यात सहभागी असलेल्या प्रमुख संशयितांची ओळख पटवली असून, क्षुल्लक वादाने एका तरुणाचा जीव घेतल्याने शहरात हळहळ व्यक्त होत आहे.







