लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.८:- : भारतीय संस्कृती आणि अध्यात्मिकतेचा अविभाज्य भाग असलेले आखाडे हे केवळ धार्मिक संघटना नसून, समाजव्यवस्था, एकात्मता, संस्कृती आणि आचार-विचारांचे प्रतीक आहेत. आदि शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या रक्षणासाठी स्थापन केलेल्या या संघटना, ‘मठाम्नाय महाअनुशासनम्’ या ग्रंथानुसार धर्मशास्त्राचे सखोल ज्ञान असलेल्या आणि सिद्ध झालेल्या साधू-संतांसाठी निर्माण केल्या होत्या.
आखाड्यांचे ऐतिहासिक महत्त्व आणि रचना
आखाड्यांचा मुख्य उद्देश समाजात आध्यात्मिक मूल्ये रुजवणे आणि नैतिक मूल्यांची स्थापना करणे हा आहे. धर्मगुरूंच्या निवड प्रक्रियेत वेदशास्त्रांचे ज्ञान, सद्गुण, नैतिकता, आत्मसंयम, करुणा, कठोरता, दूरदृष्टी आणि धार्मिकता यांवर विशेष भर दिला जातो. ही परंपरा भारतीय संस्कृती आणि एकात्मतेचे प्रतीक म्हणून आजही टिकून आहे. धार्मिक कार्यांना चालना देण्याबरोबरच हिंदू धर्म आणि त्याच्या अनुयायांचे रक्षण करणे हाही आखाड्यांचा उद्देश आहे.
एकूण १३ आखाड्यांपैकी ७ मुख्य आखाड्यांची स्थापना आद्य शंकराचार्यांनी केली. यामध्ये महानिर्वाणी, निरंजनी, जुना, अटल, अवाहन, अग्नी आणि आनंद आखाडा यांचा समावेश आहे. आखाड्यांचे मुख्यत्वे शैव आणि वैष्णव असे दोन पंथ आहेत. शैव संप्रदायातील संयुक्त संन्यासी लोकांचे १० गटात वर्गीकरण शंकराचार्यांनी केले, ज्यात गिरी, पुरी, भारती, तीर्थ, बंदी, अरण्य, पर्वत, आश्रम, सागर आणि सरस्वती यांचा समावेश आहे.
- आखाड्यांची सद्यस्थिती:
सध्या १३ आखाड्यांमध्ये ७ शैव, ३ वैष्णव आणि ३ उदासीन (सिक्ख) आखाडे आहेत. गेल्या कुंभमेळ्यात तृतीया पंथांसाठी किन्नर आखाड्याला जुना आखाड्याकडून मान्यता मिळाली आहे.
७ शैव आखाडे: जूना आखाडा, निरंजनी आखाडा, महानिर्वाणी आखाडा, आवाहन आखाडा, अटल आखाडा, आनंद आखाडा, पंचाग्नि आखाडा.
३ उदासीन (सिक्ख) आखाडे: निर्मोही आखाडा, मोठा उदासीन आखाडा, नवीन उदासीन आखाडा.
३ वैष्णव आखाडे: दिगंबर आखाडा, निर्वाणी आखाडा, निर्मोही आखाडा.
प्रत्येक आखाडा महामंडलेश्वर, श्रीमहंत, आचार्य, नागा, अघोरी, ठाणापती यांच्या नेतृत्वाखाली चालतो, जे आध्यात्मिक आणि प्रशासकीय कार्यांवर देखरेख करतात. आखाडे हे कुंभमेळ्याचा अविभाज्य भाग आहेत, त्यांची उपस्थिती त्यांच्या कायम प्रभावाचा आणि महत्त्वाचा पुरावा आहे.
सरकारकडे मागण्या: कुंभमेळा २०२७ साठीची ब्लू प्रिंट
नासिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या २०२७ च्या महाकुंभासाठी अखिल भारतीय संत समिती, धर्म समाज, महाराष्ट्र प्रदेश प्रमुख, महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांनी महाराष्ट्र सरकार आणि प्रशासनाकडे महत्त्वाच्या सूचना आणि मागण्या सादर केल्या आहेत. या मागण्या कुंभमेळ्याचे यशस्वी नियोजन, भाविकांसाठी सुविधा आणि धार्मिक परंपरांचे जतन करण्याच्या उद्देशाने आहेत.
- प्रमुख मागण्या खालीलप्रमाणे आहेत:
1. नियोजनासाठी संपर्क: प्रशासनाने आखाडा परिषद आणि हिंदूंच्या सर्वोच्च धर्मपीठाशी संपर्क साधून धर्मशास्त्रीय परंपरेनुसार जगद्गुरु शंकराचार्य आदींच्या मार्गदर्शनाखाली कुंभमेळ्याचे नियोजन करावे.
2. सुख-सुविधांची उपलब्धता: नाशिक-त्र्यंबकेश्वर आणि जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत आखाडे, मंदिरे, धार्मिक संस्था, धर्मशाळा, चॅरिटेबल ट्रस्ट आदी ठिकाणी साधुसंत आणि देशभरातून येणाऱ्या भाविक-भक्तांसाठी राहण्यायोग्य प्राथमिक गरजा आणि सुख-सुविधा उपलब्ध कराव्यात. शहरातील सर्व मठ-मंदिरांचे सुशोभीकरण करावे.
3. अमृत कुंभस्नानाची व्यवस्था: सुमारे १५ ते २० कोटी लोक जगभरातून येणार असल्याच्या अंदाजानुसार, गोदावरी नदी प्रभावित नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या चतुःसीमांवर इतर घाटांवर अमृत कुंभस्नानाची उत्तम व्यवस्था करावी, जेणेकरून गर्दी टाळता येईल.
4. सुरक्षितता आणि दर्शनासाठी व्यवस्था: साधूंच्या अमृतकुंभ पर्वणी स्नानाच्या दिवशी एक दिवस अगोदर जनतेचा प्रवेश बंद करावा. महास्नान आणि साधुसंतांच्या दिव्य दर्शनासाठी शहरात विविध ठिकाणी मोठ्या स्क्रीन्स उभाराव्यात. शहरांमध्ये जास्तीत जास्त सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत.
5. अतिक्रमण हटवा: पेशवाई आणि अमृतकुंभस्नान मार्गातील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवावीत.
6. माहिती तंत्रज्ञानाचा वापर: भाविकांची यात्रा सफल होण्यासाठी अमृत महाकुंभाचा इतिहास, स्नानासाठी अन्य घाटांची माहिती, शहरातील मुख्य आकर्षणे, पर्यटन स्थळे, अधिकृत हॉटेल्स, धर्मशाळा, प्रमुख मंदिरे यांचे गुगल मॅप आणि अत्यावश्यक यंत्रणांचे संपर्क क्रमांक असलेले ॲप महाराष्ट्र सरकारने बनवावे.
7. कॉल सेंटर आणि टोल फ्री क्रमांक: भाविकांची फसवणूक होऊ नये आणि कुंभमेळ्याची संपूर्ण माहिती मिळावी यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय भाषांचे कॉल सेंटर उभारावे आणि सरकारचा कुंभमेळा टोल फ्री नंबर जनतेला जाहीर करावा.
8. कनेक्टिव्हिटी माहितीपत्रक: भारतातील मुख्य शहरांतून कुंभमेळ्यासाठी नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे पोहोचण्यासाठी हवाई मार्ग, रेल्वे मार्ग, राज मार्ग आदी कनेक्टिव्हिटी माहितीपत्रक प्रसिद्ध करावे.
9. रेल्वे सुविधा: रेल्वे मंत्रालयाने नासिक-त्र्यंबकेश्वर महाकुंभासाठी स्पेशल ट्रेन सुरू करावी, त्र्यंबकेश्वर येथे रेल्वे स्टेशन बनवावे आणि नाशिक रोड रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्मची संख्या सध्याच्या चारवरून आठ करावी.
10. निवास व्यवस्था: प्रायव्हेट टेंट सिटी राहण्याच्या व्यवस्थांच्या निर्माण कार्यासाठी MTDC च्या संयुक्त विद्यमाने प्रोत्साहन मिळावे.
11. खबरदारीची यादी: नागरिकांनी काय खबरदारी घ्यावी आणि कोणकोणत्या अत्यावश्यक गोष्टी जवळ बाळगाव्या याची यादी सरकारने जाहीर करावी (उदा. छत्री, रेनकोट, मेडिकल रिपोर्ट, आधार कार्ड, औषधे).
12. इतर सुविधा: “हरवले व सापडले” सहाय्यता केंद्र, महिलांसाठी घाटांवर चेंजिंग रूम, जास्तीत जास्त टॉयलेट बाथरूम उभारावीत.
13. जलशुद्धीकरण: कुशावर्त कुंड आणि रामकुंड तसेच अन्य स्नानाच्या घाटांवर तात्काळ फिल्टर प्लांट आणि पाणी शुद्धीकरण यंत्र लावावीत. गोदावरी नदीत कोणतेही रसायनयुक्त पाणी किंवा सांडपाणी सोडू नये.
14. स्वयंसेवक: जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील सामाजिक संस्थांना स्वयंसेवेसाठी आवाहन करावे आणि स्वयंसेवकांना प्रशिक्षण द्यावे.
15. व्यावसायिक प्रतिबंध: सनातन हिंदू धर्माशी संबंध नसलेल्या आणि हिंदू संस्कृतीच्या विनाशासाठी कार्य केलेल्या धर्मीयांना (उदा. मुस्लिम-ख्रिश्चन) महाकुंभमेळा परिक्षेत्रात व्यवसायासाठी प्रवेश बंद करावा. सर्व हिंदू दुकानदारांनी “ॐ सर्टिफिकेट” घ्यावे.
16. मार्ग निश्चितीकरण: येण्या-जाण्याचे मार्ग निश्चित करावेत आणि त्यानुसार फलक लावावेत.
17. गोदावरी महाआरतीचा प्रचार: नाशिक-त्र्यंबकेश्वर येथील परंपरागत पुरोहित संघाच्या अतिप्राचीन गोदावरी महाआरतीचा जगभरात प्रचार व प्रसार होण्यासाठी शासनाने योग्य ते नियोजन करावे.
18. शाहीस्नान नामांतरण: साधू संतांच्या महास्नानाला यापुढे “शाहीस्नान” न संबोधता “महाकुंभ अमृतस्नान पर्वस्नान” संबोधावे.
19. प्रचार संस्थांसाठी नियमावली: साधू संतांशी व्यवहार करताना युट्यूबर व अन्य प्रचार संस्थांना नियमावली बनवावी, जेणेकरून सनातन वैदिक हिंदू धर्माचा अपप्रचार होणार नाही. उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी.
20. VIP दर्शन पद्धत बंद: जनतेमधून VIP दर्शन पद्धत बंद करावी आणि त्यासाठी VIP प्रशासकीय वेगळे मार्ग बनवावेत, जेणेकरून हिंदू जनतेची श्रद्धा व भावना दुखावणार नाहीत.
21. कुंभमेळा प्राधिकरणात समावेश: कुंभमेळा प्राधिकरणात प्रशासनातील उच्च अधिकाऱ्यांबरोबर शैव व वैष्णव १३ आखाड्यांचे प्रतिनिधी, आखाडा परिषद, अखिल भारतीय संत समिती, धर्म समाज, स्थानिक साधु-संत-महंत, पुरोहित संघ, धर्मशास्त्र अभ्यासक, धर्माचार्य, वारकरी व इतिहास तज्ञ आदींचा समावेश करून घ्यावा.
22. साधूग्राममध्ये व्यवस्था: साधूग्राममध्ये साधुसंत महंतांच्या दशनामी आखाड्यांव्यतिरिक्त इतर सर्व सनातन धर्म रक्षक संस्था, कथावाचक तसेच अन्य संप्रदाय आदींची वेगळी नियोजनबद्ध व्यवस्था सरकारने करावी.
23. ऐतिहासिक तीर्थक्षेत्रांची माहिती: अमृत महाकुंभासाठी जगभरातून साधुसंत, भाविक-भक्त जेव्हा येतील, त्याचबरोबर नाशिक-त्र्यंबकेश्वरच्या २०० ते ३०० किलोमीटर परिसरातील ऐतिहासिक पौराणिक तीर्थक्षेत्रे, ज्योतिर्लिंग व धार्मिक क्षेत्रांच्या यात्रेला जातील, त्यासाठी त्या सर्व धार्मिक स्थळांची यादी जाहीर करून तेथे पोहोचण्यासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात.
- एकूण ४१ महास्नाने:
नासिक त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या त्रिखंडात्मक कुंभमेळा २०२७ मधील एकूण महास्नानांची संख्या ४१ आहे, ज्यात ३ मुख्य शाही स्नान आणि ३८ पर्वणी स्नानांचा समावेश आहे.
या मागण्यांवर सरकारने गांभीर्याने विचार करून योग्य कार्यवाही केल्यास २०२७ चा कुंभमेळा हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी आणि अविस्मरणीय सोहळा ठरेल, अशी अपेक्षा महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेतशास्त्री महाराज यांनी व्यक्त केली.







