नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी डोक्यावरची टोपी उतरवून हिराबाई आजींच्या पायावर माथा ठेवताच महाराष्ट्र गहिवरला; खाकीतील ‘श्रावणबाळ’ पाहून पाणावले लाखो डोळे!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२० [संपादक-भगवान थोरात]:जेव्हा अधिकार विनम्रतेपुढे नतमस्तक होतो आणि कर्तव्य वात्सल्याच्या चरणी लीन होते, तेव्हा माणुसकीचा एक असा अध्याय लिहिला जातो, जो इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जातो. नाशिक शहराने काल असाच एक सुवर्णक्षण अनुभवला, जिथे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या एका अनपेक्षित कृतीने केवळ उपस्थितच नव्हे, तर अवघ्या महाराष्ट्राला गहिवराच्या एका समान धाग्यात गुंफले. हरवलेला मोबाईल परत मिळाल्याच्या आनंदात एका पंचाहत्तरीच्या आजीने मातृत्वाने पेढा भरवताच, त्या शहरातील सर्वोच्च पोलीस अधिकाऱ्याने क्षणाचाही विलंब न लावता, खाली वाकून त्या माऊलीच्या चरणांवर माथा ठेवला. वर्दीतील हा ‘श्रावणबाळ’ पाहून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या आणि एका यशस्वी मोहिमेला अविस्मरणीय भावनिक किनार मिळाली.
या हृदयस्पर्शी कथेची पार्श्वभूमी आहे नाशिक पोलिसांच्या एका भीमपराक्रमाची. आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्थापन केलेल्या ‘मोबाईल शोध विशेष पथकाने’ अवघ्या दोन महिन्यांत तब्बल १ कोटी १३ लाख रुपये किमतीचे ६०३ मोबाईल शोधून काढण्याचा चमत्कार घडवला. हेच मोबाईल त्यांच्या मालकांना परत करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात पंचाहत्तरीच्या हिराबाई भुजबळ आजीही उपस्थित होत्या. परदेशी असलेल्या नातवंडांनी प्रेमाने दिलेला, त्यांच्या आठवणींचा तो अनमोल ठेवा परत मिळताच आजींचे डोळे कृतज्ञतेने भरून आले.
त्या भावनिक भरात, थरथरत्या हातांनी त्यांनी साडीच्या पदरातून एक पेढा काढला आणि थेट आयुक्त कर्णिक यांना भरवला. “बाळा, तू माझ्या लेकरासारखा धावून आलास,” हे त्यांचे शब्द सभागृहात अमृत शिंपून गेले. पुढच्याच क्षणी जे घडले, ते केवळ अभूतपूर्व होते. आपल्या पदाचा, वर्दीचा दरारा विसरून आयुक्त कर्णिक खाली वाकले आणि त्या आजींच्या पायांना स्पर्श केला. “आजी, तुमचा आशीर्वादच आमच्या कामाची खरी पोचपावती आहे,” हे त्यांचे विनम्र शब्द आणि ती कृती म्हणजे कठोर कर्तव्याच्या खडकावर अवतरलेला करुणेचा निर्मळ झरा होता.
https://www.instagram.com/p/DOyAPHakmDH/
या घटनेने भारावलेल्या आयुक्तांनी हे विशेष पथक कायमस्वरूपी कार्यरत ठेवण्याची घोषणा केली. एका पेढ्याच्या गोडव्याने आणि चरणांवर ठेवलेल्या माथ्याने नाशिक पोलिसांच्या इतिहासात केवळ यशाचाच नव्हे, तर कर्तव्य आणि करुणेच्या अजरामर नात्याचा एक सोनेरी अध्याय लिहिला आहे.







