आमदार निधीतून २५ लाखांचा निधी मंजूर; पोलिसांचे मनोधैर्य उंचावणार, मंत्री छगन भुजबळ यांच्या दूरदृष्टीचे सर्वत्र कौतुक.
लाल 🚨 दिवा-विंचूर, ता. २० (प्रतिनिधीकडून):विंचूर आणि परिसरातील कायदा-सुव्यवस्था अधिक बळकट करत गुन्हेगारीला जबर चाप लावण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस दलाच्या शिरपेचात आज एक मानाचा तुरा खोवला गेला. राज्याचे विकासपुरुष आणि अन्न, नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या दूरदृष्टीने आणि गतिमान कार्यशैलीने विंचूर पोलीस चौकीच्या अत्याधुनिक इमारतीसाठी तब्बल २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. आज त्यांच्याच शुभहस्ते या वास्तूची मुहूर्तमेढ रोवत भूमिपूजन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या निर्णयामुळे पोलीस दलाचे मनोधैर्य प्रचंड उंचावले असून, आता गुन्हेगारांचे धाबे दणाणणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली आहे.
यावेळी मंचावर उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.

गेली अनेक वर्षे विंचूर पोलीस चौकी जागेअभावी आणि अपुऱ्या सुविधांमुळे अनेक अडचणींचा सामना करत होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही येथील पोलीस कर्मचारी आपले कर्तव्य चोख बजावत होते. मात्र, एका सुसज्ज आणि आधुनिक चौकीची गरज तीव्रतेने भासत होती. ही बाब लक्षात येताच, जनतेच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांनी तात्काळ आमदार स्थानिक विकास निधीतून २५ लाख रुपयांचा भरीव निधी मंजूर केला. त्यांच्या या एका निर्णयाने पोलीस दलाला मोठे बळ मिळाले आहे. “या नवीन आणि प्रशस्त इमारतीमुळे आमच्या कार्यक्षमतेत निश्चितच वाढ होईल. आम्ही अधिक प्रभावीपणे काम करून परिसरातील नागरिकांना सुरक्षिततेची हमी देऊ,” अशा भावना सहायक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांनी व्यक्त केल्या.
यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले, “पोलीस ऊन, वारा, पावसाची पर्वा न करता समाजाच्या रक्षणासाठी उभे असतात. त्यांना चांगल्या सुविधा पुरवणे हे आपले कर्तव्य आहे. ही पोलीस चौकी केवळ एक इमारत नसून, ती जनतेच्या मनात सुरक्षेची भावना निर्माण करणारा एक विश्वासस्तंभ ठरेल. विकासासोबतच कायदा आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या नव्या पोलीस चौकीमुळे विंचूर आणि परिसरातील औद्योगिक वसाहती, बाजारपेठ आणि सर्वसामान्य नागरिकांना एक मोठे सुरक्षेचे कवच लाभणार आहे. पोलिसांच्या शौर्याला विकासाची जोड देणाऱ्या मंत्री छगन भुजबळ यांच्या या निर्णयाचे सर्व स्तरांतून जोरदार स्वागत होत आहे.







