लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.३० :-विशेष प्रतिनिधीनाशिककरांनो सावधान! आपल्या शहरात पैशाच्या जोरावर कायद्याची आणि निसर्गाची कशी क्रूर थट्टा चालली आहे, याचा एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार विलोळी परिसरात समोर आला आहे. विलोळी जकात नाका, पंपिंग स्टेशन आणि सीएनजी पंपाच्या पुढे ‘वरूण कन्स्ट्रक्शन’ कडून कोणतीही अधिकृत परवानगी न घेता राजरोसपणे अक्राळविक्राळ आणि बेकायदेशीर ब्लास्टिंग (दगड फोडण्यासाठीचे स्फोट) सुरू आहे. या भीषण स्फोटांच्या थरथराटाने परिसरातील शांतता भंग पावली असून, आपल्या देशाची शान असलेल्या दोन राष्ट्रीय पक्षी म्हणजेच मोरांचा जागीच तडफडून मृत्यू झाला आहे!
महापालिकेच्या पाण्याच्या टाकीला मोठा धोका! प्रशासन ढिम्म!
धक्कादायक बाब म्हणजे, ज्या ठिकाणी हे शक्तीशाली बेकायदेशीर ब्लास्टिंग सुरू आहे, तिथेच नाशिक महानगरपालिकेच्या पाण्याच्या टाकीचे कामही सुरू आहे. या रोजच्या ब्लास्टिंगमुळे पाण्याच्या टाकीच्या पायाला तडे जाऊन भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. कोट्यवधी रुपयांच्या या शासकीय कामाला आणि स्थानिक नागरिकांच्या जीवाला धोक्यात घालण्याचे धाडस वरूण कन्स्ट्रक्शनकडे आले कुठून? यांना ब्लास्टिंगची परवानगी नेमकी दिली कोणी? की पैशांच्या जोरावर हा सगळा काळाबाजार सुरू आहे?
पोलिसांची उडवाउडवीची उत्तरे; जनतेने न्याय मागायचा कोणाकडे?
या बेकायदेशीर कृत्याबाबत जेव्हा एका जागरूक नागरिकाने पोलीस स्टेशनला फोन करून माहिती दिली, तेव्हा पोलिसांनी अत्यंत बेजबाबदारपणाचे दर्शन घडवले. “आम्हाला काय सांगता, वन विभागाला जाऊन सांगा!” असे निर्लज्ज उत्तर देऊन पोलिसांनी आपले हात झटकले.
जर देशाचा राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांचा असा बळी जात असेल आणि पोलीस यंत्रणा सहकार्य करण्याऐवजी पळवाट शोधत असेल, तर सामान्य जनतेने दाद कोणाकडे मागायची? वन विभाग आणि नाशिक मनपा प्रशासन उघड्या डोळ्यांनी हा विनाश बघूनही आंधळे सोंग का घेत आहे?
आता तरी कारवाई होणार की बिल्डरच्या दबावापुढे प्रशासन गुडघे टेकणार?
हा केवळ पर्यावरणाचा ऱ्हास नाही, तर थेट कायद्याला आव्हान देणारा प्रकार आहे. या प्रकरणी वरूण कन्स्ट्रक्शनच्या मालकांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कारवाई होणार की अधिकारी नेहमीप्रमाणे डोळे मिटून घेणार? याकडे आता संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून राहिले आहे.






