सत्ताधाऱ्यांचे ८ लाख आणि विरोधकांचे १५ लाख खिशात; दोन्हीकडून ‘लक्ष्मीदर्शन’ घेऊन मतदारांनी मारला डल्ला; रिसॉर्टवरील ‘थपडा-थपडीची’ राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा !
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२४विशेष प्रतिनिधी |
नुकतीच पार पडलेली विधान परिषद निवडणूक ही लोकशाहीचा उत्सव ठरण्याऐवजी ‘नोटांचा महाउत्सव’ ठरल्याचे आता उघड झाले आहे. निवडणुका संपल्या, निकाल लागले, पण या निकालांनंतर जे ‘रामायण’ बाहेर येत आहे, ते ऐकून सर्वसामान्य जनतेचे डोळे चक्रावले आहेत. स्वतःला सुशिक्षित, सुसंस्कृत आणि जनतेचे कैवारी म्हणवून घेणाऱ्या या ‘माननीय’ मतदारांनी (लोकप्रतिनिधींनी) या निवडणुकीत स्वतःचीच अशी काही बोली लावली की, बाजारातल्या शेळ्या-मेंढ्याही लाजतील!
५० कोटींचा चुराडा अन् दीडशे कोटींचा पाऊस!
राजकीय गोटातून मिळालेल्या अत्यंत खात्रीशीर माहितीनुसार, या निवडणुकीत शेकडो मतदारांवर तब्बल दीडशे कोटींपेक्षा जास्त पैशांचा पाऊस पाडण्यात आला. सत्ताधाऱ्यांकडून प्रति मतदार ८ लाख रुपयांचे ‘प्रसाद’ वाटण्यात आले, तर विरोधकांनी थेट १५ लाखांची ‘फुली’ मारत सत्ताधाऱ्यांच्या नाकात दम आणला. म्हणजेच एका मतदाराची किंमत तब्बल २३ लाख रुपये झाली!
दोन्ही हातांनी मलिदा; मतदान मात्र एकालाच!
यातली सर्वात मिश्किल आणि डोके सुन्न करणारी बाब म्हणजे, आपल्या या ‘प्रामाणिक’ मतदारांनी कुणाचेही मन दुखवले नाही. त्यांनी सत्ताधाऱ्यांचे ८ लाखही गोड मानून घेतले आणि विरोधकांचे १५ लाखही खिशात घातले. दोन्ही बाजूंनी २३ लाखांची चांदी करून घेणाऱ्या या मतदारांनी मतपेटीत मात्र एकालाच कौल दिला. आता सर्वात मोठा आणि यक्षप्रश्न हा उपस्थित होत आहे की, ज्या पराभूत उमेदवाराचे पैसे पाण्यात गेले, त्याचे पैसे हे ‘स्वाभिमानी’ मतदार परत करणार का? की “दिलेले पैसे देवाघरचे झाले” असे म्हणून गप्प बसणार?
पैशांच्या वाटपावरून ‘दाढीवाल्या’ शिंदेंचा थेट थोबाडीत मारल्याचा राडा?
या महानाट्यात केवळ पैशांचा खेळ झाला नाही, तर थेट ‘हातघाईचे’ राजकारणही पाहायला मिळाले. एका गुप्तस्थळी (रिसॉर्टवर) मतदारांना कोंडून ठेवले असताना, तिथे पैशांच्या वाटपावरून मोठा गोंधळ उडाला. काही मतदारांना पैसे कमी वाटल्याने तिथे थेट ‘दाढीवाल्या’ शिंदेंनी एन्ट्री घेतली आणि तिथे उपस्थित असणाऱ्या एका नेत्याच्या थेट थोबाडीतच लगावल्याची खमंग चर्चा सध्या रंगली आहे. १५ कोटींच्या निधीवरून थेट ५० कोटींच्या घरात गेलेल्या या बजेटमुळे हा ‘थपडा-थपडीचा’ कार्यक्रम झाल्याचे बोलले जात आहे.
स्वतःला लोकशाहीचे आधारस्तंभ म्हणवून घेणारे हे मतदार आता २३ लाखांचे मालक बनून उजळ माथ्याने समाजात फिरत आहेत. ज्या मतदारांनी जनतेच्या विश्वासाचा असा जाहीर लिलाव मांडला, त्यांच्याकडून आता नैतिकतेची अपेक्षा करणे म्हणजे गाढवाकडून दुधाची अपेक्षा करण्यासारखे आहे. पराभूतांचे पैसे परत करण्याचे धाडस हे मतदार दाखवतील का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे!







