गुन्हे दाखल असूनही अंबड पोलिसांची तोतयासोबत ‘चाय पे चर्चा’! तर जेलमध्ये गुंडांना व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यासाठी रचला कट ?
लाल 🚨 दिवा-नाशिक,२७:-विशेष प्रतिनिधी, नाशिक :नाशिक शहरात सध्या एकाच नावाची आणि एकाच ‘पार्टी’ची जोरदार चर्चा रंगली आहे, आणि ती म्हणजे लाल दिव्याच्या गाडीतून फिरणारा तोतया अधिकारी ‘गौरव मिश्रा’! या महाशयाने केवळ सर्वसामान्यांनाच नव्हे, तर चक्क पोलीस आणि तुरुंग प्रशासनाला अक्षरशः आपल्या खिशात घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाथर्डी फाटा येथील एका आलिशान फ्लॅटमध्ये नाशिकच्या तब्बल पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना या तोतयाने दारू पार्टी दिली. संतापजनक आणि खाकीला लाजवणारी बाब म्हणजे, या दारू पार्टीच्या नशेत चक्क एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याला या तोतयाने आपली फरशी पुसायला लावल्याची अत्यंत खळबळजनक चर्चा सध्या पोलीस वर्तुळात दबक्या आवाजात सुरू आहे.
लाल दिव्याचा रुबाब आणि खाकीचे ‘सलाम’
स्वतःला मोठा ‘आयपीएस’ किंवा वरिष्ठ शासकीय अधिकारी भासवणारा गौरव मिश्रा चक्क लाल दिव्याच्या गाडीतून शहरात फिरायचा. पोलीस आयुक्तालयातील अनेक बड्या अधिकाऱ्यांवर त्याने आपला वचक निर्माण केला होता. त्याची ही बनवाबनवी उघडकीस आल्यानंतर इंदिरानगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला. त्यानंतर फसवणुकीच्या प्रकरणात अंबड पोलीस ठाण्यातही त्याच्यावर दोन गुन्हे दाखल झाले. २१ नोव्हेंबर २०२४ रोजी तो जामिनावर सुटला. पण इथूनच खरा धक्कादायक प्रकार सुरू होतो!
अंबड पोलिसांची गुन्हेगारासोबत ‘चाय पे चर्चा’
गुन्हे दाखल असूनही आणि त्याचे खरे रूप समोर येऊनही काल-परवापर्यंत हा तोतया अंबड पोलिसांच्या गळ्यातील ताईत होता. अंबड पोलीस ठाण्यासमोर असलेल्या कॅन्टीनमध्ये काही पोलीस कर्मचारी दररोज त्याच्यासोबत चहा-नाश्ता आणि सिगारेट पिताना दिसतात. एवढेच नव्हे, तर पोलीस कर्मचारी ऐटीत त्याच्याच आलिशान गाडीतून फिरतानाही दिसले आहेत. या सर्व प्रकाराकडे अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोळ्यांवर पट्टी बांधून का बसले आहेत? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.
कुख्यात टोळीशी संधान; जेल अधिकाऱ्यांसोबत मटण-दारूची पार्टी
या तोतया अधिकाऱ्याचे धाडस एवढे वाढले की तो थेट नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहाच्या आवारात पोहोचला. नाशिकमधील एका कुख्यात टोळीतील गुंड सध्या जेलमध्ये बंदिस्त आहेत. त्यांना कारागृहात सर्व बेकायदेशीर सुविधा (VIP Treatment) पुरवण्यासाठीच गौरव मिश्राने जेल अधिकाऱ्यांशी संधान साधले. जेल अधिकारी निवासस्थानाच्या बाहेरील परिसरात तुरुंग अधिकारी हिरालाल भामरे, अशोक मलवाड आणि जगदीश दुमणे या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत या तोतयाची मटण-दारूची पार्टी रंगली. या पार्टीचा व्हिडिओ व्हायरल होताच कारागृह प्रशासनात मोठा भूकंप झाला आहे.
सर्वसामान्यांनी न्याय कोणाकडे मागायचा?
कारागृह प्रशासनाने तातडीने या तिन्ही तुरुंग अधिकाऱ्यांना ‘कारणे दाखवा नोटीस’ बजावून ७ दिवसांत खुलासा मागितला आहे. त्यांच्यावर निलंबनाची टांगती तलवार आहे. पण खरा प्रश्न उपस्थित होतो तो नाशिक पोलिसांच्या कार्यप्रणालीवर! एकीकडे नाशिकचे पोलीस आयुक्त पोलिसांची प्रतिमा सुधारण्यासाठी रात्रंदिवस एक करत आहेत, तर दुसरीकडे पोलीस कर्मचारीच जर गुन्हेगारांसोबत उघडपणे पार्ट्या झोडत असतील आणि त्यांच्या गाड्यांमध्ये फिरत असतील, तर सर्वसामान्यांनी कोणाच्या भरोशावर राहायचे? ज्या अंबड पोलिसांच्या नाकाखाली हा तोतया खुलेआम फिरत आहे, त्या अंबड पोलिसांची आता वरिष्ठ पातळीवरून सखोल चौकशी होणार का? याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून आहे.






