लाल 🚨 दिवा-नाशिक ,२३:-(विशेष क्राईम रिपोर्टर): नाशिककरांची झोप उडवणारी आणि गुन्हेगारांच्या गोटात खळबळ उडवून देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे! एमआयडीसी अंबड परिसरातील एका कंपनीत तब्बल ९ लाखांच्या तांब्याच्या कॉइलची चोरी झाल्याने उद्योग विश्वात एकच खळबळ उडाली होती. पण, “चोर कितीही हुशार असला तरी तो पोलिसांपेक्षा दोन पावले मागेच असतो” हे अंबड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले आहे. अवघ्या काही तासांत या महाचोराच्या अशा काही मुसक्या आवळल्या की ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!
रात्रीच्या अंधारात ‘अल्टो’तून चोरी!
घटना आहे १९ आणि २० एप्रिल २०२६ दरम्यानची. अंबड एम.आय.डी.सी येथील ‘फेअरडील इलेक्ट्रीकल अँड इंजिनिअरिंग प्रा.ली.’ या कंपनीवर रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत अज्ञात चोरांनी डल्ला मारला आणि चक्क ९ लाख ३४ हजार रुपये किमतीच्या ‘ट्रान्सफार्मरच्या कॉपर कॉईल’ गायब केल्या! सकाळी जेव्हा कंपनीचे ६२ वर्षीय मालक दिनेश दवे यांनी हा प्रकार पाहिला, तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी तातडीने अंबड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
अंबड पोलिसांचा ‘अॅक्शन मोड’ आणि गुप्त खबऱ्यांचे जाळे!
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथक ‘अॅक्शन मोड’मध्ये आले. या गुन्ह्याचा तपास सपोनि विलास पडोळकर यांच्याकडे सोपवण्यात आला. पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पण पो.शि. फरीद ईनामदार आणि मते यांनी गुप्त खबऱ्यांचे असे काही जाळे विणले, तर दुसरीकडे पो.शि. मयुर पवार आणि अनिल गाढवे यांनी सीसीटीव्ही फुटेजची डोळ्यात तेल घालून तपासणी केली. आणि अखेर या ‘स्मार्ट’ चोराचा पर्दाफाश झालाच!
अन् चोराच्या मुसक्या आवळल्या!
मिळालेल्या पक्क्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संजय पांडुरंग सकट (वय ३२, रा. महालक्ष्मीनगर, नाशिक) या सराईत आरोपीला अत्यंत शिताफीने बेड्या ठोकल्या. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. विशेष म्हणजे, या महाभागाने चोरीचा माल वाहून नेण्यासाठी चक्क मारुती सुझुकी अल्टो (MH 15 BX 313) या दीड लाखांच्या कारचा वापर केला होता! पोलिसांनी चोरीला गेलेल्या ९.३४ लाखांच्या कॉईल आणि कार असा तब्बल १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चोराची चांगलीच जिरवली आहे.
पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, उपायुक्त श्री. किशोर काळे आणि सहाय्यक आयुक्त श्री. सचिन बारी यांनी या ‘सुपरफास्ट’ कारवाईबद्दल अंबड पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. सपोनि विलास पडोळकर आणि त्यांच्या संपूर्ण टीमने केलेल्या या धडक कारवाईमुळे संपूर्ण शहरात आता एकच चर्चा आहे – “खाकी वर्दीचा धाक असावा तर असा!”






