नाशिक! गुन्हेगारांचे अड्डे थेट जेसीबीने जमीनदोस्त; राजकीय ‘दादां’ना आयुक्तांचा सज्जड दम!

राजकीय हस्तक्षेप दिसल्यास थेट कारवाईचा इशारा; आयुक्तांच्या ‘सरप्राईज व्हिजिट’ने पोलीस दलही अचंबित

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.८:-: शहरात वाढत्या गुन्हेगारीने त्रस्त झालेल्या नाशिककरांना अखेर पोलिसांच्या धडक कारवाईचा थरार अनुभवायला मिळाला. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे अड्डे बनलेल्या अतिक्रमणांवर पंचवटी पोलिसांनी थेट जेसीबीचा नांगर फिरवत त्यांना भुईसपाट केले. बुधवारी दुपारी अचानक झालेल्या या कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, संपूर्ण पंचवटी परिसरात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, कारवाई सुरू असताना पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः घटनास्थळी अचानक भेट देऊन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवले.

नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीने कळस गाठला होता. सामान्य नागरिक दहशतीच्या छायेत वावरत होते. सोशल मीडियावर नाशिककरांनी आपला संताप व्यक्त करत पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. टीकेची झोड उठल्यानंतर जागे झालेल्या पोलीस प्रशासनाने गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात केली होती. ‘रील’ बनवून पोलिसांना आव्हान देणाऱ्या टवाळखोरांची रस्त्यावरून धिंड काढण्यात आली होती.

मात्र, यावरच न थांबता पंचवटी पोलिसांनी एक पाऊल पुढे टाकत गुन्हेगारांचे अड्डेच उद्ध्वस्त करण्याचा धडाका लावला आहे. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास पंचवटी पोलिसांनी अचानक पेठ रोड ते मखमलाबाद लिंक रोडवरील अवैध बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला. मनपा प्रशासनाला वेळेवर पाचारण करत पेठ रोड आणि आरटीओ कार्यालयासमोर थाटलेली अवैध शेड, चायनीजच्या गाड्या आणि अंडा भुर्जीच्या टपऱ्या जेसीबीच्या साहाय्याने जमीनदोस्त करण्यात आल्या. या कारवाईने गुन्हेगारांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे, तर सामान्य नागरिकांनी या कारवाईचे तोंडभरून कौतुक केले आहे.

यावेळी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक पोलीस आयुक्त संगीता निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजेंद्र पाटील, सहायक पोलीस निरीक्षक सतीश शिरसाट यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात होता.

१: आयुक्त थेट मैदानात; राजकीय नेत्यांना सज्जड दम!

पंचवटी पोलिसांनी गुन्हेगारांच्या अड्ड्यांवर कारवाई सुरू केल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरताच, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी स्वतः घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कारवाईचा आढावा घेत अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक करून त्यांची पाठ थोपटली. “ही कारवाई केवळ एक दिवसापुरती नाही, तर आता रोज आणि मोठ्या प्रमाणावर केली जाईल,” असे आयुक्तांनी स्पष्ट केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, “गुन्हेगारांना वाचवण्यासाठी कोणत्याही राजकीय नेत्याने हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावरही थेट कारवाई केली जाईल,” असा खणखणीत इशारा आयुक्तांनी दिला आहे. आयुक्तांच्या या भूमिकेमुळे पोलीस दलाचे मनोधैर्य उंचावले आहे.

: मनपा अतिक्रमण विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह!**

वास्तविक पाहता ही कारवाई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाने करणे अपेक्षित होते. मात्र, या विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अतिक्रमणधारकांशी आर्थिक हितसंबंध असल्याची चर्चा अनेकदा सिद्ध झाली आहे. याच कारणामुळे शहरात अतिक्रमणांचे पेव फुटले होते. आजही कारवाईवेळी अतिक्रमणधारक मनपा कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत होते. “पैसे घेऊनही कारवाई का करता?” असा थेट आरोप करत असल्याने, मनपाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!