शांतता आणि सुव्यवस्थेसाठी अंबड पोलिसांचे कठोर पाऊल; १४ जणांवर कारवाई.

टवाळखोरांचे धाबे दणाणले, नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण; आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशाने विशेष मोहिमेचा दणका

लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ८ ऑक्टोबर: नाशिक शहरात शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदिप कर्णिक यांनी गुन्हेगारी विरोधात कठोर पाऊले उचलण्याचे आदेश दिल्यानंतर, अंबड पोलिसांनी आपल्या हद्दीत ‘ऑपरेशन ऑल आऊट’ राबवत गुन्हेगारी जगताला जोरदार हादरा दिला आहे. मंगळवारी सायंकाळच्या वेळी अचानक राबवलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी रेकॉर्डवरील तब्बल १४ सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला. या कारवाईमुळे टवाळखोर आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचे धाबे दणाणले असून, सामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेचे आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे.

पोलीस उप आयुक्त श्री. किशोर काळे आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली, अंबड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास, जेव्हा वर्दळीची वेळ सुरू होते, तेव्हाच अंबड पोलिसांच्या विविध पथकांनी एकाच वेळी पवननगर, उत्तमनगर, सिडको, पाथर्डी फाटा, त्रिमुर्ती चौक यांसारख्या संवेदनशील आणि गजबजलेल्या भागांना वेढा घातला. पोलिसांच्या गाड्यांचे सायरन ऐकताच रस्त्यावरील टवाळखोर आणि संशयितांची पळापळ सुरू झाली. मात्र, पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने सापळा रचून रेकॉर्डवरील गुन्हेगारांना लक्ष्य केले.

या कारवाईत, ज्यांच्यावर दोनपेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत आणि जे पोलीस रेकॉर्डवर ‘सराईत’ म्हणून नोंद आहेत, अशा १४ जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलीस ठाण्यात आणून त्यांची कसून झाडाझडती घेण्यात आली. यापैकी ११ आरोपींवर मुंबई पोलीस कायद्यान्वये, तर उर्वरित ३ आरोपींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहितेनुसार कडक प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे, जेणेकरून ते भविष्यात कोणताही गुन्हा करणार नाहीत.

ही कौतुकास्पद कामगिरी श्री. जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक श्री. सचिन खैरनार, सपोनि किरण रौंदळे, प्रताप गिरी, बागुल आणि गुन्हे शोध पथकाच्या सर्व धाडसी अधिकारी व अंमलदारांनी यशस्वी करून दाखवली

“कायदा आणि सुव्यवस्थेशी खेळ खपवून घेणार नाही!”

“नाशिक शहराची शांतता आणि सुरक्षितता ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. यासाठी परिमंडळ-२ अंतर्गत येणाऱ्या सर्व पोलीस ठाण्यांना सराईत गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवण्याचे आणि त्यांच्या हालचालींवर नजर ठेवण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. अंबड पोलिसांनी केलेली कारवाई ही त्याच व्यापक मोहिमेचा एक भाग आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी हे लक्षात ठेवावे की, पोलिसांची नजर तुमच्यावर आहे. शहरात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा कोणताही प्रयत्न आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. नागरिकांनी निर्भयपणे राहावे, पोलीस दल त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.”

श्री. किशोर काळे,

         पोलीस उप आयुक्त, परिमंडळ-२

गुन्हेगारी खपवून घेणार नाही!”

“शहरातील शांतता भंग करणाऱ्या आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या कोणत्याही गुन्हेगारी प्रवृत्तीला खपवून घेतले जाणार नाही. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल कटिबद्ध असून, अशा धडक मोहिमा यापुढेही सातत्याने राबवण्यात येतील. नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांना सहकार्य करावे.”

श्री. जग्वेंद्रसिंग राजपूत, वरिष्ठ पोलीस

निरीक्षक, अंबड पोलीस ठाणे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!