‘भयमुक्त नाशिक’ची घोषणा हवेतच विरणार? सत्ताधाऱ्यांनो, आधी पक्षातील गुन्हेगार बाहेर काढा!

मनसे-ठाकरे गटाच्या जनआक्रोश मोर्चानंतर जागे झालेल्या सत्ताधाऱ्यांवर मनसेचा घणाघात; दिनकर अण्णा पाटील यांचा थेट सवाल

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.५:- प्रतिनिधी:शहरात फोफावलेली गुन्हेगारी, अमली पदार्थांचा विळखा, अवैध धंदे आणि हानी ट्रॅपच्या वाढत्या घटनांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी काढलेल्या विराट ‘जनआक्रोश मोर्चा’ने सत्ताधाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या मोर्चानंतर खडबडून जागे झालेल्या सत्ताधारी नेत्यांनी ‘गुन्हेगार मुक्त नाशिक’, ‘भयमुक्त नाशिक’ अशा घोषणांचा पाऊस पाडला आहे. मात्र, ही केवळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक असून, जागे होण्याचे सोंग आणण्याआधी सत्ताधाऱ्यांनी आपल्याच पक्षात आश्रय घेतलेल्या गुन्हेगारांची हकालपट्टी करावी, असा घणाघाती हल्ला मनसेचे प्रदेश सरचिटणीस दिनकर अण्णा पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे नाशिकचे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

गेल्या काही महिन्यांपासून नाशिक शहर गुन्हेगारीच्या विळख्यात सापडले आहे. खून, दरोडे, खंडणी, अवैध सावकारी आणि महिलांना लक्ष्य करणाऱ्या हानी ट्रॅपच्या घटनांनी नागरिक भयभीत झाले आहेत. या गंभीर परिस्थितीकडे प्रशासनाचे आणि सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी १२ सप्टेंबर २०२५ रोजी मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी संयुक्तपणे नाशिकमध्ये भव्य ‘जनआक्रोश मोर्चा’ काढला. या मोर्चाला मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहून सत्ताधारी भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांच्या गोटात खळबळ उडाली. त्यानंतर तातडीने बैठका घेऊन ‘नाशिक भयमुक्त’ करण्याच्या घोषणा देण्यात आल्या. मात्र, सत्ताधाऱ्यांची ही भूमिका दुटप्पी असल्याचा आरोप दिनकर पाटील यांनी केला आहे.

दिनकर पाटील यांनी सत्ताधाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप घेत काही अनुत्तरित प्रश्न उपस्थित केले आहेत. ते म्हणाले, “आमचा मोर्चा पोलीस प्रशासनाविरुद्ध नव्हता, तर गुन्हेगारीला मिळणाऱ्या राजकीय आश्रयाविरोधात होता. सत्ताधारी जर सत्तेसाठी कोणत्याही थराला जाऊन गंभीर गुन्हे असलेल्या लोकांना पक्षात प्रवेश देत असतील, तर त्यांनी भयमुक्तीच्या गप्पा मारू नयेत. आधी आपले घर साफ करा, मग शहराची चिंता करा.”

पक्षातील गुन्हेगारी: तिन्ही सत्ताधारी पक्षांमध्ये गंभीर गुन्हे दाखल असलेले, खंडणीखोर आणि देशविघातक शक्तींशी संबंध असलेले लोक उजळ माथ्याने फिरत आहेत. त्यांना पक्षात कोणी घेतले?

गुन्ह्यांमध्ये सत्ताधाऱ्यांचा सहभाग?: शहरात अलीकडेच झालेल्या खून, अपहरण, वसुली आणि हानी ट्रॅपच्या प्रकरणांमध्ये सत्ताधारी पक्षातील लोकांची नावे समोर आली आहेत, त्याचे काय?

पाकिस्तान’ वक्तव्य: ज्या मतदारांनी निवडून दिले, त्याच मतदारसंघाला ‘पाकिस्तान’ म्हणून हिणवणारे लोकप्रतिनिधी तुमच्याच पक्षात आहेत. त्यांच्यावर काय कारवाई केली?

संघाच्या संचलनातील घुसखोरी: नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पवित्र संचलनातही गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक घुसले होते, ही बाब सत्ताधाऱ्यांसाठी लाजीरवाणी नाही का?

आधी हकालपट्टी, मगच घोषणा

“जोपर्यंत सत्ताधारी आपल्या पक्षातील गुन्हेगार आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांना बाहेरचा रस्ता दाखवत नाहीत, तोपर्यंत ‘भयमुक्त नाशिक’ ही केवळ एक मृगजळ ठरेल. केवळ बैठका घेऊन आणि पोकळ घोषणा करून नागरिकांची फसवणूक थांबवावी. नाशिकच्या जनतेला सुरक्षित वातावरण हवे आहे, पण ते गुन्हेगारांना पाठीशी घालून मिळू शकत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जागे होण्याचे सोंग करण्याऐवजी आधी पक्षातील गुन्हेगारीचा नायनाट करावा,” असा थेट इशारा दिनकर पाटील यांनी दिला आहे.

एकंदरीत, जनआक्रोश मोर्चानंतर नाशिकमधील राजकीय संघर्ष अधिक तीव्र झाला असून, सत्ताधाऱ्यांच्या ‘भयमुक्त नाशिक’ घोषणेतील हवाच मनसेने काढून घेतली आहे. आता या गंभीर आरोपांवर सत्ताधारी काय उत्तर देतात, याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!