टवाळखोर, तळीराम आणि सोशल मीडियावरील ‘भाई’ पोलिसांच्या जाळ्यात; नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
लाल 🚨 दिवा-नाशिक, दि. ५ ऑक्टोबर: शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या धडक मोहिमेअंतर्गत, अंबड पोलिसांनी काल सायंकाळी गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना जोरदार दणका दिला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या नेतृत्वाखाली तब्बल १५ अधिकारी आणि ६८ अंमलदारांच्या फौजफाट्याने केलेल्या ‘कोंबिंग ऑपरेशन’मुळे अंबड परिसरातील गुन्हेगारांमध्ये अक्षरशः थरकाप उडाला आहे.
मा. पोलीस उप आयुक्त श्री. किशोर काळे आणि सहायक पोलीस आयुक्त श्री. शेखर देशमुख यांच्या आदेशानुसार, दिनांक ४ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत हे धडक ऑपरेशन राबवण्यात आले. पोलिसांनी अंबड परिसरातील संवेदनशील मानले जाणारे फडोळ मळा, शिवाजी चौक, इंदिरानगर वसाहत, लेखानगर, पवननगर, पाथर्डी फाटा आणि त्रिमूर्ती चौक यांसारख्या ठिकाणी अचानक छापे टाकले. पोलिसांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे टवाळखोर, तळीराम आणि सराईत गुन्हेगारांची पळता भुई थोडी झाली.
या कारवाईचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, इन्स्टाग्रामवर धोकादायक रिल्स बनवून समाजात दहशत पसरवणाऱ्या दोन तरुणांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्यांच्यावर माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तरुणाईमध्ये चुकीचा संदेश पसरवणाऱ्या या ‘रिल्स’ बहाद्दरांवरील कारवाईमुळे सोशल मीडियावर दहशत माजवणाऱ्यांना सणसणीत चपराक बसली आहे.
सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या १६ तळीरामांना पोलिसांनी कायद्याचा हिसका दाखवत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. तसेच, विनाकारण फिरणाऱ्या आणि मुलींची छेड काढणाऱ्या ७९ टवाळखोरांवर कारवाई करून त्यांना चांगलीच अद्दल घडवली. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील महिला आणि नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी रेकॉर्डवरील १५ गुन्हेगार, १० हिस्ट्रीशीटर आणि हद्दीतून तडीपार केलेल्या ०६ आरोपींची झाडाझडती घेतली. कायदा मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा देत पोलिसांनी शहरात शांतता भंग करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, हे स्पष्ट केले आहे. यासोबतच, २३० लोकांची ‘स्टॉप अँड सर्च’ कारवाई आणि १६ वॉरंटची बजावणी करून पोलिसांनी आपल्या कार्यक्षमतेचा परिचय दिला.
एकंदरीत, अंबड पोलिसांच्या या धडक मोहिमेमुळे गुन्हेगारीला मोठा आळा बसणार असून, परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीचे कौतुक केले आहे. यापुढेही अशा कारवाया सुरूच राहणार असल्याचे संकेत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
या यशस्वी कामगिरीमध्ये सपोनि किरण रौंदळे, प्रताप गिरी, बागुल, पोउनि नितीन फुलपगारे, सविता उंडे, झनकसिंग घुनावत यांच्यासह गुन्हे शोध पथकाचे मोलाचे योगदान राहिले.







