आमच्या प्रतिनिधीकडून लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.५:-राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्यासाठी आणि त्यांच्याप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दल धावून आले आहे. केवळ कायदा आणि सुव्यवस्थेचेच नव्हे, तर सामाजिक बांधिलकीचेही रक्षण आम्ही करतो, याचा आदर्श वस्तुपाठ घालून देत, पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने ५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केला. मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हा धनादेश स्वीकारला आणि नाशिक पोलिसांच्या या संवेदनशीलतेचे भरभरून कौतुक केले.
राज्यात यंदा झालेल्या अतिवृष्टीने शेतकरी बांधवांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीच्या काळात पोलीस दलाने अहोरात्र मदतकार्य करून आपले कर्तव्य बजावले होतेच, पण आपली जबाबदारी तिथेच संपत नाही, या भावनेतून पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी एक अभिनव उपक्रम हाती घेतला. त्यांनी आपल्या दलातील सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांना पूरग्रस्त बांधवांना मदत करण्यासाठी ऐच्छिक योगदानाचे आवाहन केले.
या आवाहनाला संपूर्ण दलाने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येकाने आपल्या परीने खारीचा वाटा उचलत अल्पावधीतच ५ लाख रुपयांचा निधी संकलित केला. हाच निधी घेऊन पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि संपूर्ण नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने मदतीचा धनादेश त्यांच्याकडे सोपवला.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, “संकटकाळात पोलीस दल नेहमीच आघाडीवर असते. नाशिक ग्रामीण पोलिसांनी केवळ आपले कर्तव्यच चोख बजावले नाही, तर त्यापलीकडे जाऊन समाजाप्रती असलेली आपली जबाबदारीही जपली आहे. त्यांचे हे कार्य निश्चितच कौतुकास्पद आणि इतरांसाठी प्रेरणादायी आहे.”
या निधीचा उपयोग राज्यातील आपत्तीग्रस्त नागरिकांच्या पुनर्वसनासाठी केला जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. खाकी वर्दीच्या आत दडलेल्या या माणुसकीच्या झऱ्याने आज संपूर्ण महाराष्ट्राची मने जिंकली आहेत.
“शेतकरी हा समाजाचा कणा आहे. त्याच्यावर आलेल्या संकटकाळात त्याच्या पाठीशी उभे राहणे हे आमचे कर्तव्य आहे. हा निधी म्हणजे आमच्या दलातील प्रत्येक कर्मचाऱ्याच्या भावनांचे प्रतीक आहे.”
श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, ना
शिक ग्रामीण**







