अनुकंपा आणि लिपिक पदांवर १०,३०९ जणांना नियुक्तीपत्रे; हजारो कुटुंबांना मोठा दिलासा

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शनिवारी मुंबईत मुख्य सोहळा, पालकमंत्र्यांच्या हस्ते जिल्हास्तरावर वितरण

लाल 🚨 दिवा-आपला वार्ताहर,मुंबई, दि. ३ : राज्य शासनाच्या विविध विभागांमध्ये प्रलंबित असलेल्या अनुकंपा आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) शिफारस केलेल्या लिपिक पदांच्या भरतीला अखेर मुहूर्त लागला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने शनिवारी, ४ ऑक्टोबर रोजी एकाच दिवशी तब्बल १०,३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्रांचे वाटप केले जाणार आहे. यामुळे अनेक वर्षांपासून नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या हजारो कुटुंबांना मोठा आधार मिळणार आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे सकाळी ११.३० वाजता होणाऱ्या या ऐतिहासिक सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असेल. यासोबतच विधानसभेचे अध्यक्ष, विविध मंत्री आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. मुंबईतील मुख्य कार्यक्रमासोबतच प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या हस्ते उमेदवारांना नियुक्तीपत्रे प्रदान केली जातील.

अनुकंपाचा अनुशेष अखेर संपुष्टात

शासकीय सेवेत असताना कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला नोकरी देणाऱ्या अनुकंपा तत्त्वावरील नियुक्त्या अनेक वर्षांपासून प्रशासकीय व तांत्रिक कारणांमुळे रखडल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संवेदनशील विषयात जातीने लक्ष घालून नवीन धोरण आखले आणि प्रलंबित प्रकरणे मार्गी लावण्याचे निर्देश दिले. याचाच परिणाम म्हणून प्रतीक्षायादीतील ५,१८७ उमेदवारांना एकाच वेळी नियुक्ती मिळणार असून, अनुकंपा भरतीचा मोठा अनुशेष दूर होणार आहे.

अनुकंपा उमेदवारांसोबतच, महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत लिपिक-टंकलेखक पदासाठी निवड झालेल्या ५,१२२ उमेदवारांनाही नियुक्तीपत्रे दिली जाणार आहेत. या एकूण १०,३०९ नियुक्त्यांमध्ये सर्वाधिक ३,०७८ उमेदवार कोकण विभागातील आहेत. त्याखालोखाल विदर्भात २,५९७, मराठवाड्यात १,७१०, पुणे विभागात १,६७४ आणि नाशिक विभागात १,२५० उमेदवारांचा समावेश आहे.

 ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ ध्येयाकडे वाटचाल

शासनाने ‘विकसित महाराष्ट्र-२०४७’ हे ध्येय समोर ठेवले आहे. प्रशासकीय सुधारणांच्या १५० दिवसांच्या कार्यक्रमांतर्गत ही महाभरती मोहीम ‘मिशन मोड’वर हाती घेण्यात आली आहे. ही केवळ एक भरती नसून, सुधारणा आणि परिवर्तनशील प्रशासनाप्रती शासनाच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!