भुजबळांचा ‘ओबीसी’ एल्गार; मराठा लॉबी हादरली, सत्तेच्या समीकरणांना हादरा!

मराठा नेत्यांना सत्तेची चिंता, भुजबळांना मात्र समाजाची निष्ठा! संविधानाचा अपमान की सामाजिक न्यायाचा सन्मान?

लाल 🚨 दिवा-नाशिक दि.४:-राजकीय वादळ (विशेष प्रतिनिधी), मुंबई:दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत केलेले एक विधान राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण करत आहे. “मी ओबीसी नेता म्हणून आमदार व मंत्री आहे,” या त्यांच्या रोखठोक आणि प्रामाणिक विधानानंतर तथाकथित मराठा नेत्यांच्या आणि त्यांच्या समर्थकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. जे नेते आजवर जातीची समीकरणे पडद्याआड राहून साधत होते, त्यांना भुजबळांनी आरसा दाखवल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. भुजबळांचे हे विधान घटनाबाह्य ठरवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू झाला असला, तरी हा ओबीसी समाजाच्या अस्मितेचा बुलंद आवाज असल्याची चर्चा तळागाळात सुरू झाली आहे.

संविधानाचा बुरखा आणि राजकीय कांगावा

भुजबळांच्या विधानानंतर काही गटांकडून संविधानाच्या शपथेची आठवण करून दिली जात आहे. “कोणत्याही समाजाबद्दल आकस वा ममत्व बाळगणार नाही,” या शपथेचा दाखला दिला जात आहे. मात्र, हीच मंडळी सोयीस्करपणे विसरतात की, लोकशाहीत प्रत्येक नेता कोणत्या ना कोणत्या सामाजिक घटकाचे प्रतिनिधित्व करत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांपासून ते कांशीराम यांच्यापर्यंत अनेक नेत्यांनी आपल्या समाजाचा आवाज बनूनच राजकारणात आपले स्थान निर्माण केले. भुजबळांनी “मी ओबीसी नेता आहे” असे म्हणणे म्हणजे इतर समाजाचा द्वेष करणे नव्हे, तर ज्या समाजाने आपल्याला इथपर्यंत पोहोचवले, त्या समाजाच्या हक्कांसाठी आपण कटिबद्ध आहोत, ही प्रामाणिक कबुली आहे.

उलट, जे मराठा नेते आजवर सत्तेची फळे चाखत आले, त्यांनी कधी उघडपणे “मी मराठा नेता आहे” असे म्हटले नाही, कारण त्यांना इतर समाजाची मते गमावण्याची भीती होती. त्यांची भूमिका प्रामाणिकपणाची नसून, राजकीय सोयीची होती. भुजबळांनी मात्र सत्तेची पर्वा न करता आपली ओळख आणि आपल्या समाजाप्रती असलेली निष्ठा उघडपणे मांडली आहे. हाच त्यांच्यातील आणि इतर नेत्यांमधील मूलभूत फरक आहे.

येवल्यातील विरोध: अस्वस्थतेचे प्रतीक !

येवला तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी पांडुरंग शेळके पाटील यांनी भुजबळांवर टीका केली आहे. पण ही टीका म्हणजे भुजबळांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघातच मराठा लॉबी किती अस्वस्थ झाली आहे, याचे द्योतक आहे. भुजबळांच्या एका वाक्याने जर मित्रपक्षातील नेत्यांना इतकी मिरची झोंबत असेल, तर यावरूनच भुजबळांचा मुद्दा किती अचूक ठिकाणी लागला आहे, हे सिद्ध होते. नेते सत्तेसाठी लाचार होतात, पण भुजबळ समाजासाठी लढायला तयार आहेत. सामान्य कार्यकर्ता नेत्याच्या भूमिकेकडे पाहतो, आणि भुजबळांसारखा लढणारा नेताच कार्यकर्त्यांना भावतो, हेच सत्य आहे.

भुजबळांची भूमिका: द्वंद्व नाही, तर स्पष्टता !

भुजबळांचे विधान हे द्वंद्वात्मक नसून, आरशासारखे स्वच्छ आहे. ते म्हणतात, “मी ज्या समाजातून आलो, त्या समाजाचे हित पाहणे हे माझे कर्तव्य आहे आणि ते मी बजावणारच.” यात घटनात्मक भंग कुठे येतो? संविधानानेच ओबीसी समाजाला आरक्षण देऊन त्यांचे हक्क मान्य केले आहेत. त्या हक्कांचे संरक्षण करणे हे लोकप्रतिनिधीचे काम नाही का?

मराठा नेत्यांना भीती वाटते की, भुजबळांप्रमाणे जर प्रत्येक नेता आपल्या समाजाची ओळख उघडपणे सांगू लागला, तर त्यांचे ‘सर्वसमावेशक’ राजकारणाचे ढोंग उघडे पडेल. त्यांना सत्ता गमावण्याची भीती वाटते, पण भुजबळांना समाजाचा विश्वास गमावण्याची भीती वाटते. त्यामुळेच, भुजबळांना ना भीती आहे, ना कुणाची कदर !

जिभेचा फटका’ नव्हे, ‘सत्याचा झटका’

भुजबळांचे विधान महायुतीसाठी ‘जिभेचा फटका’ नसून, आरक्षणाच्या नावाखाली ओबीसींच्या हक्कांवर गदा आणू पाहणाऱ्यांसाठी ‘सत्याचा झटका’ आहे. त्यांनी महायुतीला आरसा दाखवला आहे की, केवळ एका समाजाच्या दबावाखाली झुकून चालणार नाही, तर ओबीसींच्या भावनांचाही आदर करावा लागेल. भुजबळांनी ही भूमिका घेतली नसती, तर ओबीसी समाज महायुतीपासून दुरावला असता. त्यामुळे भुजबळांनी पक्षाचे नुकसान नाही, तर एका मोठ्या वर्गाला पक्षाशी जोडून ठेवण्याचे काम केले आहे.

थोडक्यात, भुजबळांचे विधान हे बेजबाबदार नसून, ते एका धुरंधर, लढाऊ आणि आपल्या समाजाशी प्रामाणिक असलेल्या नेत्याचे आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. ज्यांना भीती वाटते, ते संविधानाचा बुरखा पांघरतात, पण ज्याच्यात हिंमत असते, तो छगन भुजबळांसारखा छातीठोकपणे आपली भूमिका मांडतो

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

error: Content is protected !!