साल्हेरसह १२ किल्ल्यांना जागतिक वारसा दर्जा!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि..१२:-नाशिककरांसाठी आज अभिमानाचा दिवस! आपल्या जिल्ह्यातील ऐतिहासिक साल्हेर किल्ल्यासह महाराष्ट्रातील राजगड, रायगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूतील जिंजी या बारा भव्य किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाची साक्ष देणारे हे किल्ले आता जागतिक पटलावर विशेष ओळख निर्माण करतील.

या ऐतिहासिक घटनेनिमित्त नाशिकमध्ये आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा १३ जुलै रोजी सायंकाळी ५:३० वाजता सीबीएस येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकावर साजरा केला जाणार आहे.

नाशिकच्या प्रत्येक नागरिकाला या आनंदोत्सवात सहभागी होऊन हा आनंद द्विगुणित करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. चला, एकत्र येऊया आणि आपल्या गौरवशाली इतिहासाचा जयघोष करूया!
जय जिजाऊ! जय शिवराय!







