महापालिकेचा निर्लज्जपणा! भारतीय चित्रपटसृष्टीच्या जनकालाच विसरले; ३० एप्रिलला ‘दादासाहेब फाळके जयंती’चा उडाला फज्जा!

▪️ प्रतिमेला साधा पुष्पहारही नाही; प्रशासनाच्या ‘सांस्कृतिक’ विभागाला लागलीये वाळवी!

▪️ फाळके स्मारकाचे गोडवे गाणाऱ्या अधिकाऱ्यांना जन्मदिनाचाच पडला विसर; नाशिककरांमध्ये तीव्र संताप!

▪️ कोट्यवधींचे बजेट उधळणाऱ्या महापालिकेला महापुरुषांच्या जयंतीचे वावडे?

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.१:- विशेष प्रतिनिधी नाशिक भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक आणि नाशिकचे सुपुत्र महर्षी दादासाहेब फाळके यांच्या जयंतीदिनी (३० एप्रिल) नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाने अक्षम्य आणि संतापजनक अनास्था दाखवली आहे. संपूर्ण देश दादासाहेबांच्या महान योगदानाला सलाम करत असताना, त्यांच्याच कर्मभूतीत महापालिकेच्या निर्ढावलेल्या प्रशासनाला त्यांच्या जयंतीचा पार विसर पडल्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. नेहमीच गल्लाभरू आणि मलिदा मिळवून देणाऱ्या ‘टेंडर’च्या कामांमध्ये रस दाखवणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांनी या महामानवाच्या आदरांजलीला केराची टोपली दाखवल्याने नाशिककरांच्या भावना तीव्र दुखावल्या गेल्या आहेत.

सांस्कृतिक विभाग की झोपाळू विभाग?

महापालिकेत महापुरुषांच्या जयंती आणि पुण्यतिथी साजरी करण्याची, तसेच शासकीय प्रोटोकॉल पाळण्याची जबाबदारी जनसंपर्क आणि सांस्कृतिक विभागाची असते. मात्र, ३० एप्रिल रोजी या विभागाचे अधिकारी नक्की कोणत्या ‘महत्त्वाच्या’ कामात व्यस्त होते? महापालिकेच्या मुख्य इमारतीत दादासाहेब फाळके यांच्या प्रतिमेला साधा एक पुष्पहार अर्पण करण्याची तसदीही या निगरगट्ट प्रशासनाने घेतली नाही. एरवी क्षुल्लक आणि दिखाऊ कार्यक्रमांसाठी लाखो रुपयांची उधळपट्टी करणारी महापालिका, फाळकेंच्या जयंतीला मात्र अचानक ‘स्मृतिभ्रंश’ झाल्यासारखी वागली.

फाळके स्मारका’च्या नावावर केवळ राजकारणच?

नाशिकमध्ये दादासाहेब फाळके यांच्या नावाने उभारलेले भव्य स्मारक आहे. या स्मारकाच्या दुरुस्ती आणि देखभालीच्या नावाखाली दरवर्षी लाखो रुपयांच्या निविदा काढल्या जातात आणि त्यातून अनेकांचे खिसे गरम होतात. पण ज्यांच्या नावाने हे स्मारक आहे, त्या महर्षींच्या जन्मदिनाची साधी आठवणही आयुक्तांपासून ते खालच्या शिपायापर्यंत कुणालाही राहिली नाही, हा महापालिकेचा मोठा दैवदुर्विलास आहे. हा केवळ दादासाहेब फाळकेंचा नाही, तर संपूर्ण कलाविश्वाचा आणि नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेचा अपमान आहे.

एकीकडे महाराष्ट्र दिनाच्या सोहळ्यात उडालेला प्रशासनाचा गोंधळ आणि दुसरीकडे फाळके जयंतीचा विसर, यावरून प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि असंवेदनशीलता उघडी पडली आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे नेतेही यावर मूग गिळून गप्प का आहेत? या अक्षम्य चुकीसाठी सांस्कृतिक आणि जनसंपर्क विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार का? की नेहमीप्रमाणे ‘चुकून राहिले’ असे सांगून या संतापजनक प्रकरणावर पांघरूण घातले जाणार, असा परखड सवाल आता चित्रपटप्रेमी आणि सामान्य नाशिककर करत आहेत.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

💥 धडक बातमी: नाशिक ग्रामीणमध्ये कायद्याच्या राज्याचा नवा अध्याय सुरू! 💥 गुन्हेगारांच्या उरात धडकी तर सर्वसामान्यांना दिलासा; धडाकेबाज ‘सिंघम’ डॉ. डी. एस. स्वामी यांच्या हाती नाशिक ग्रामीण पोलिसांची कमान!

error: Content is protected !!