लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.५:-नाशिकरोड (विशेष प्रतिनिधी):नाशिकरोड परिसरातील अत्यंत गजबजलेल्या ‘स्टार मॉल’ला आज अचानक लागलेल्या भीषण आगीने संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. आगीचे लोट आणि आकाशाला भिडणारे काळ्याकुट्ट धुराचे साम्राज्य एवढे भयंकर आहे की बघ्यांच्या काळजाचा ठोका चुकत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले असून, आगीच्या या रौद्ररूपावर नियंत्रण मिळवण्यासाठी जवानांची अक्षरशः शर्थीची झुंज सुरू आहे.
रुग्ण आणि नागरिकांचा जीव धोक्यात!
या घटनेतील सर्वांत धक्कादायक आणि काळजाचा थरकाप उडवणारी बाब म्हणजे, या ‘स्टार मॉल’मध्ये केवळ शॉपिंग सेंटर्सच नाहीत, तर अनेक रुग्णालये देखील थाटण्यात आली आहेत! आगीच्या या भयंकर तांडवात शॉपिंगसाठी आलेले शेकडो नागरिक आणि रुग्णालयात उपचार घेत असलेल्या निष्पाप रुग्णांचा जीव अक्षरशः टांगणीला लागला आहे. धुरामुळे श्वास कोंडत असल्याने प्राण वाचवण्यासाठी आतून येणाऱ्या किंकाळ्या आणि बाहेर नातेवाईकांचा आक्रोश यामुळे परिसरातील वातावरण अत्यंत भयावह झाले आहे.
अग्निरोधक यंत्रणेचे वाजले ‘तीन तेरा’
या भीषण दुर्घटनेने मॉल प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे आणि भ्रष्ट कारभाराचे अक्षरशः वाभाडे काढले आहेत. एवढ्या मोठ्या कमर्शियल कॉम्प्लेक्समध्ये ‘अग्निसुरक्षा यंत्रणेचे (Fire Safety)’ चक्क ‘तीन तेरा’ वाजल्याचे उघड झाले आहे. आग विझवण्यासाठी कोणतीही प्रभावी प्रतिबंधक यंत्रणा मॉलमध्ये कार्यरत नसल्यानेच ही आग एवढ्या वेगाने भडकल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी करत आहेत. पैशांच्या हव्यासापोटी लोकांच्या जिवाशी खेळणाऱ्या या मॉल प्रशासनाला याचा जाब कोण विचारणार? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे.
सध्या अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून, आत अडकलेल्या रुग्ण आणि नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्याचे शर्यतीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, या भीषण आगीने शहराच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला आहे.






