रक्षकच बनले भक्षक! वनविभागाच्या आशीर्वादाने त्र्यंबक-हर्सूलमध्ये ‘वृक्ष हत्याकांड’; लाकूडमाफिया मालामाल, जनता मात्र डोळ्यांवर हात ठेवून बेहाल!

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.३:- त्र्यंबकेश्वर (विशेष प्रतिनिधी):“बर्बाद गुलिस्तां करने को बस एक ही उल्लू काफी था, हर शाख पे उल्लू बैठा है, अंजाम-ए-गुलिस्तां क्या होगा!” ही प्रसिद्ध शायरी आज त्र्यंबकेश्वर, हर्सूल आणि पेठ परिसरातील वनविभागाच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभाराला तंतोतंत लागू पडते. रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली या नंदनवनात सध्या ‘वृक्षतोडीचा महायज्ञ’ सुरू आहे आणि या यज्ञात वनविभागाचे अधिकारी आपल्या खिशाची आहुती देऊन ‘मलई’ खाण्यात मग्न आहेत. “कुंपणानेच शेत खाल्ले” या मराठी म्हणीचा प्रत्यय सध्या नाशिकच्या जंगलात पदोपदी येत आहे. 

रस्ता रुंदीकरण की जंगल साफ मोहीम?

त्र्यंबकेश्वर, हर्सूल, पेठ या निसर्गरम्य भागात रस्ता रुंदीकरणासाठी काही ठिकाणी खाजगी जागेवरील वृक्षतोडीला परवानगी देण्यात आली. पण ठेकेदारांनी आणि लाकूडमाफियांनी “बहती गंगा में हाथ धोना” या तत्त्वानुसार जिथे परवानगी नाही, तिथल्याही झाडांची कत्तल उडवली. टेंडर मिळालेल्या एजन्सीने रस्त्यासोबतच चक्क जंगलातील झाडांवरही कुऱ्हाड चालवली. आणि आपले ‘सिंघम’ वनकर्मचारी काय करत होते? बहुधा डोळ्यांवर गांधारीची पट्टी बांधून ‘आंधळी कोशिंबीर’ खेळत होते! 

संत आणि समाजसुधारकांचा विसर !

जगद्गुरू संत तुकाराम महाराजांनी अभंग रचला होता, “वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती...” पण वनविभागासाठी आता वृक्षवल्ली ‘सोयरी’ नसून ‘रोकड’ आणि ‘टक्केवारी’ बनली आहे! 

क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांनी इशारा दिला होता की, “विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली…” इथे मात्र वनविभागाची ‘नीती’च हरवली आहे आणि पैशाच्या हव्यासापोटी माफियांची ‘संपत्ती’ वाढली आहे. राष्ट्रसंत गाडगेबाबा ओरडून सांगत राहिले “झाडे लावा, झाडे जगवा”, पण इथल्या अधिकाऱ्यांचा मंत्र एकच आहे- “झाडे कापा, खिसे भरा!”

शाहेनशहा’च्या स्टाईलमध्ये विनापरवाना वाहतूक

जंगलातील लाकूड तोडल्यानंतर त्याची विनापरवाना जव्हार मार्गे थेट मुंबईकडे तस्करी सुरू आहे. वनविभागाच्या नाकावर टिच्चून इमारती लाकूड पास होत आहे. वनकर्मचाऱ्यांना विचारले तर त्यांची अवस्था त्या प्रसिद्ध बॉलिवूड डायलॉगसारखी होते- “ये पब्लिक है, सब जानती है!”पण अधिकारी मात्र रिश्ते में तो हम तुम्हारे बाप लगते है, और नाम है लाकूडमाफिया”* या थाटात वावरणाऱ्या तस्करांपुढे नतमस्तक झालेले दिसतात. देखावा करण्यासाठी फक्त किरकोळ मालाचा डेपो करून ठेवला आहे. 

टोपले मॅडमचा गुजरात पॅटर्न आणि इरिगेशनचा ‘सपोर्ट’

दोन-तीन दिवसांपूर्वी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, सिसम आणि खैर यांसारख्या अत्यंत दुर्मिळ आणि अमूल्य प्रजातींची जंगलातून कत्तल करण्यात आली. हे लाकूड ‘टोपले’ नावाच्या महिलेच्या घरापाशी साठवले जात आहे. विशेष म्हणजे या मॅडमचा सुपुत्र इरिगेशन डिपार्टमेंट (पाटबंधारे विभाग) मध्ये कार्यरत आहे. ना तोडीचा परवाना, ना वाहतुकीचा! तरीही दोन्ही प्रकारची वाहतूक त्यांच्या घरापासून थेट गुजरातला होत आहे. जणू काही “अंधेर नगरी चौपट राजा, टके सेर भाजी टके सेर खाजा!”

शोलेचा गब्बरही लाजेल असा ‘आदिल-सदरू’चा प्रताप!

हरसुल ते ओझरखेड देव डोंगर नाका या भागात तर भ्रष्टाचाराचा कळस गाठला गेला आहे. आदिल कोकणी आणि सदरू शेठ या लाकूड व्यापाऱ्यांनी या भागात काम घेतले आहे. या महाशयांना परवानगी होती अवघ्या ८० घनमीटर लाकूड तोडण्याची. पण “बोट दिले तर हात गिळतात” या उक्तीप्रमाणे यांनी चक्क वीस पट घनमीटर लाकूड तोडून लंपास केले! 

यावर ‘शोले’ चित्रपटातील गब्बर सिंगचा डायलॉग आठवतो- “कितने आदमी थे? सरदार, परमिशन ८ पट ची होती पण आम्ही ५०पट उडवले!” तरीही वनविभागाचे अधिकारी फक्त “तारीख पे तारीख” देत आहेत, कारवाईचा पत्ताच नाही.

हे सगळं महाभयंकर रॅकेट बघितल्यावर वाटतं, वनविभागाच्या अधिकाऱ्यांना ‘पर्यावरण रक्षण’ नव्हे, तर ‘लाकूड भक्षण’ पुरस्कार देऊन त्यांचा सत्कार करायला हवा! जंगलाचा हा ‘वनवास’ कधी संपणार आणि या भ्रष्ट रावण-रूपी माफियांवर कारवाईचा ‘रामबाण’ कधी चालणार, हाच खरा सवाल आहे!

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

💥 धडक बातमी: नाशिक ग्रामीणमध्ये कायद्याच्या राज्याचा नवा अध्याय सुरू! 💥 गुन्हेगारांच्या उरात धडकी तर सर्वसामान्यांना दिलासा; धडाकेबाज ‘सिंघम’ डॉ. डी. एस. स्वामी यांच्या हाती नाशिक ग्रामीण पोलिसांची कमान!

error: Content is protected !!