खाकीचा माज: शेजाऱ्यांच्या वादात पोलिसांनी काढली आपलीच ‘हौस’; ७० हजारांचे नुकसान करत वर्दीची ‘दहशत’
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.२:- (विशेष प्रतिनिधी):‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीदवाक्य मिरवणाऱ्या महाराष्ट्र पोलिसांतील काही ‘शूरवीर’ अधिकाऱ्यांनी या वाक्याचा नवा अर्थ शोधून काढला आहे— ‘मद्य प्या आणि निष्पापांना बडवा!’ कायदा आणि सुव्यवस्थेचे धडे देणाऱ्या देवळाली कॅम्प पोलिसांनी ३० एप्रिल २०२६ च्या रात्री चरणवाडी (शिंगवे बहुला) येथे एका लग्नाच्या रिसेप्शनमध्ये जो ‘नंगानाच’ घातला, तो पाहता हे रक्षक आहेत की टोळभैरव, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
नेमका प्रकार काय? मद्याच्या नशेत ‘सिंघम’ स्टाईल एन्ट्री!
चरणवाडी येथील सूर्यकांत देवकर यांचे नातेवाईक नागेश गायकवाड यांच्या लग्नाचे रिसेप्शन सुरू होते. नियम पाळून रात्री ९:३० ला कार्यक्रम आवरता घेतला जात होता. पण तेवढ्यात देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे अधिकारी श्री. शाम कोटमे आपल्या ६-८ ‘सशस्त्र’ योध्यांसह तिथे धडकले. कोणतीही पूर्वसूचना नाही, जमावाला पांगवण्याचा इशारा नाही; थेट लाठ्या-काठ्यांचा पाऊस! ज्या महिला आणि लहान मुलांचे रक्षण करण्याची शपथ या पोलिसांनी घेतली होती, त्याच निष्पापांवर या ‘मद्यधुंद सिंघम’नी अमानुष लाठीचार्ज करत स्वतःच्या ‘शौर्याचे’ प्रदर्शन घडवले.
गुन्ह्यांच्या नोंदींचा (FIR) खेळ: स्वतःची कातडी वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न?
समोर आलेल्या गुन्ह्यांच्या नोंदी (FIR क्र. १७२ आणि १७३/२०२६) पाहिल्यावर पोलिसांचा खरा चेहरा उघडा पडतो. डीजेच्या आवाजावरून शेजारील दोन गटांत (चौघुले आणि देवकर/गायकवाड) वाद झाला होता. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी गेलेल्या पोलिसांनी तिथे मध्यस्थी करून वाद मिटवणे अपेक्षित होते. मात्र, मद्याचा दर्प आणि खाकीचा माज अंगात भिनलेल्या पोलिसांनी या वादाचे भांडवल करत आपलाच वेगळा ‘अजेंडा’ राबवला. भांडण सोडवण्याऐवजी संपूर्ण मंडप, डीजे आणि डेकोरेशनची तोडफोड करत ७० हजारांचे नुकसान केले आणि वरून दोन्ही गटांवर गुन्हे दाखल करून स्वतःची कातडी वाचवण्याचा ‘उत्कृष्ट’ प्रयत्न केला आहे.
अश्लील शिवीगाळ आणि खाकीचा दहशतवाद
सर्वांत संतापजनक बाब म्हणजे, या ‘सुसंस्कृत’ पोलिसांच्या तोंडातून दारूचा उग्र वास आणि अश्लील शिव्यांचा महापूर एकाच वेळी वाहत होता. रफिक शेख, रंजना गायकवाड, गणेश देवकर यांच्यासह अनेक वयोवृद्ध आणि लहान मुले या भ्याड हल्ल्यात जखमी झाली आहेत. शासकीय रुग्णालयाचे MLC रिपोर्ट या ‘खाकी दहशतवादाची’ साक्ष देत आहेत
एखाद्या गुन्हेगारालाही लाजवेल अशी वागणूक देणाऱ्या या हुकूमशहा पोलिसांवर आता नाशिक पोलीस आयुक्त कठोर कारवाई करणार का? की ‘खाकी भाई-भाई’ म्हणत या मद्यपी अधिकाऱ्यांना पाठीशी घालणार? पुराव्यांचा पेन ड्राईव्ह, जखमींचे वैद्यकीय अहवाल आणि साक्षीदारांची यादी आयुक्तांच्या टेबलावर पोहोचली आहे. आता न्याय मिळतो की या फाईल्सही ‘मद्याच्या बाटलीखाली’ दाबल्या जातात, याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागून आहे.






