───२ महिने, ४ जिल्हे अन् खाकीचा ‘सिनेस्टाईल’ चेस! सातपूरच्या ‘गोल्डमॅन’ला लुटणाऱ्या मास्टरमाईंडला नाशिक पोलिसांकडून बेड्या; १४ लाखांचे सोने जप्त!

अन् नाशिक पोलिसांच्या जिद्दीपुढे लुटारूंनी टेकले गुडघे! सातपूरच्या ‘गोल्डमॅन’ला लुटणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या आवळल्या मुसक्या, १४ लाखांची ‘रिकव्हरी’ 

लाल 🚨 दिवा -नाशिक,५:- (विशेष प्रतिनिधी):सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असणाऱ्या सातपूर येथील ‘गोल्डमॅन’ला लुटून पसार झालेल्या अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात नाशिक पोलिसांना मोठे यश आले आहे. चित्रपटातील कथेलाही लाजवेल अशा थरारक पद्धतीने, तब्बल दोन महिने चार जिल्ह्यांमध्ये पाठलाग करून पोलिसांनी या गुन्ह्यातील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या या धडक कारवाईत तब्बल १४ लाख रुपये किमतीची सोन्याची लगड (बिस्किट) हस्तगत करण्यात आली असून, नाशिक पोलिसांच्या या ‘सिंघम’गिरीचे संपूर्ण शहरात कौतुक होत आहे.

दिनांक २३ मार्च २०२६ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास, सातपूर येथील ‘गोल्डमॅन’ आपला टेलरिंगचा व्यवसाय आटोपून कारने घरी परतत होते. सातपूर बसस्थानकासमोरील कानिफनाथ मंदिराजवळ तीन अज्ञात लुटारूंनी त्यांच्या कारला अचानक घेराव घातला. गाडीत घुसून धारदार चाकूचा धाक दाखवत आणि जीवे मारण्याची धमकी देत या लुटारूंनी त्यांच्या गळ्यातील दोन भारी वजनाच्या सोन्याच्या चेन हिसकावल्या आणि दुचाकीवरून अंधारात पोबारा केला. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली होती.

खाकीचा सज्ज झाला फास!

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, परिमंडळ-२ चे उपायुक्त किशोर काळे, आणि सहायक आयुक्त संदीप मिटके व सचिन बारी यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. गुन्हे शाखा युनिट-२ आणि सातपूर पोलिसांनी आव्हानाचा स्वीकार केला आणि सुरू झाला एक महाभयंकर ‘चेस’!

आरोपी अत्यंत सराईत होते. तांत्रिक माहितीच्या आधारे त्यांची ओळख पटली होती, मात्र ते वारंवार आपली ठिकाणे बदलत होते. सलग दोन महिने जळगाव, बुलढाणा, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे अशा विविध जिल्ह्यांमध्ये पोलिसांची पथके त्यांच्या मागावर होती. पोलीस पोहोचण्यापूर्वीच आरोपी अवघ्या काही तासांच्या फरकाने निसटत होते. मात्र, नाशिक पोलिसांच्या जिद्दीपुढे अखेर गुन्हेगारांनी गुडघे टेकलेच.

अन् जाळ्यात अडकला मोठा मासा!

दिनांक २८ मे २०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ चे हवालदार नंदकुमार नांदुर्डीकर आणि महेश खांडबहाले यांना खबऱ्याकडून पक्की माहिती मिळाली. त्यानुसार आनंदवली, गंगापूर रोड परिसरातील एका अपार्टमेंटमधून संभाजी विलास कवळे (वय ३०) या मुख्य संशयिताला मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सातपूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक आजिनाथ बटुळे यांनी त्याला अटक करून न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळवली.

१४ लाखांची रिकव्हरी आणि पोलिसांचे ‘मानवी कौशल्य’

वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे आणि सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीची कसून चौकशी सुरू झाली. पोलिसांच्या ‘खास’ शैलीतील विचारपूस आणि मानवी कौशल्याचा वापर होताच आरोपीने पोपटासारखी सर्व माहिती ओकली.

यानंतर सपोउपनि मनोहर शिंदे, पोहवा चंद्रकांत गवळी, पोअं तेजस मते, सुनील खैरनार, तसेच सातपूरचे पोउनि आजिनाथ बटुळे, सपोउनि अनिल आहेर, रविंद्र जाधव, पारस देशमुख, संजय दराडे आणि तुषार देसले यांच्या विशेष पथकाने थेट बोदवड (जि. जळगाव) गाठले. तिथे अत्यंत शिताफीने तपास करत लुटलेल्या सोन्यापासून बनवलेली १०.५ तोळे वजनाची आणि तब्बल १४,००,०००/- (चौदा लाख) रुपये किमतीची ‘सोन्याची लगड’ हस्तगत केली!

गुन्हेगारांना स्पष्ट इशारा

गुन्हे शाखा आणि सातपूर पोलिसांच्या या संयुक्त आणि धडाकेबाज कामगिरीमुळे नाशिक शहरात गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत. “नाशिक पोलिसांच्या नजरेतून कोणताही गुन्हेगार सुटू शकत नाही,” हाच कडक संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे. या उत्कृष्ट कामगिरीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांसह नाशिककरांकडून तपास पथकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

नाशिक पोलिसांचा धडक निर्णय: ‘बोगस शालार्थ आयडी’ महाघोटाळ्याच्या मुळावर घाव घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची मोठी खेळी, क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करणाऱ्या एसीपी संदीप मिटकेंकडे सोपवली तपासाची सूत्रे!

error: Content is protected !!