ऑईलच्या एका थेंबाने उघड केले १ कोटींचे रहस्य! नाशिकरोड पोलिसांचा थरारक पाठलाग; BSNL केबल चोरट्यांची आंतरजिल्हा टोळी गजाआड

लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.४:-(विशेष प्रतिनिधी):रात्रीचा अंधार… रस्त्यावर शुकशुकाट… आणि जमिनीखालून लाखोंची सरकारी केबल गायब करणारी एक अट्टल आंतरजिल्हा टोळी! पण या गुन्हेगारांना हे माहिती नव्हतं की, नाशिकरोड पोलिसांची ‘करडी नजर’ त्यांच्यावर आधीच रोखलेली आहे. केवळ एका गळक्या ऑईलच्या थेंबावरून धागा पकडत नाशिकरोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करून या हाय-प्रोफाईल चोरीचा पर्दाफाश केला आहे. या धडक कारवाईत पोलिसांनी चक्क १ कोटी ५ लाख रुपयांचा घसघशीत मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेला जेसीबी जप्त करत खाकी वर्दीचा दरारा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे!

नाशिकरोड येथील बिटको चौक ते संजय मेडिकल परिसरात ३० ते ३१ मे दरम्यान एका अज्ञात टोळीने अत्यंत शिताफीने सिमेंटचे चेंबर उघडून BSNL कंपनीची तब्बल ३५ लाख रुपयांची अंडरग्राउंड (UG) केबल यंत्राच्या साहाय्याने खेचून चोरून नेली. याप्रकरणी BSNL चे अधिकारी बाळासाहेब कोटकर यांच्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात गंभीर गुन्ह्याची नोंद झाली होती. शासनाचे मोठे नुकसान झाल्याने हे आव्हान मोठे होते.

पोलिसांची ‘गरुड झेप’ आणि तो गळणारा ऑईलचा थेंब…

गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तपासाचे कडक आदेश दिले. गुन्हे शोध पथकाचे अंमलदार रात्रीची गस्त घालत असताना बिटको चौकातून लॅम रोडकडे जाणारा एक संशयित मालवाहू टेम्पो पोलिसांची गाडी पाहताच सुसाट वेगाने पळू लागला. पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून तो सुटला नाही. पोलिसांनी तातडीने त्याचा पाठलाग सुरू केला.

धावत्या टेम्पोच्या मागील भागातून ‘ऑईल’ गळत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले आणि त्यांचा संशय अधिकच बळावला. पोलिसांनी आपला जीव धोक्यात घालून या टेम्पोला आडवे लावून थांबवले. जेव्हा टेम्पोची झडती घेण्यात आली, तेव्हा आत BSNL च्या चोरीला गेलेल्या केबलचे तुकडे आढळून आले.

मुंबईचे कनेक्शन उघड, ४ आरोपी अटकेत

या कारवाईत पोलिसांनी मुंबईतून आलेले सराईत गुन्हेगार वाहाब अब्दुल नवाज (३५), सुरेश दिलीप वैराळ (३७), बसंतलाल राजाराम यादव (३८) (सर्व रा. मुंबई) यांच्या मुसक्या आवळल्या. तसेच गुन्ह्यात वापरलेला जेसीबी आणि त्याचा चालक कमलेशकुमार रविदास (२६, रा. बिहार) यालाही बेड्या ठोकल्या आहेत.

वरिष्ठांचे मार्गदर्शन आणि टीम वर्कचा विजय

पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक, उपायुक्त श्री. किशोर काळे, आणि सहायक आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या खंबीर मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. जितेंद्र सपकाळे, पोनि अतुल चौधरी, सपोनि प्रवीण सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विशाल पाटील (तपासी अधिकारी), सागर आडणे, महेंद्र जाधव, अरुण गाडेकर, रोहित शिंदे आणि योगेश रानडे यांनी ही ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे.

पोलिसांच्या या ‘अॅक्शन मोड’मुळे सरकारी मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून, नाशिककरांकडून पोलिसांच्या या सतर्कतेचे आणि शौर्याचे मोठे कौतुक होत आहे!

Lal Diwa News
Author: Lal Diwa News

मुख्य संपादक- भगवान थोरात
8888772888
laldivalive@gmail.com
bhagwanrao.thorat@gmail.com

विज्ञापन

और पढ़ें

नाशिक पोलिसांचा धडक निर्णय: ‘बोगस शालार्थ आयडी’ महाघोटाळ्याच्या मुळावर घाव घालण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची मोठी खेळी, क्लिष्ट गुन्ह्यांची उकल करणाऱ्या एसीपी संदीप मिटकेंकडे सोपवली तपासाची सूत्रे!

error: Content is protected !!