पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचा धडाकेबाज निर्णय; राज्यातील शिक्षण व्यवस्थेला हादरवणाऱ्या गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्याची पोलिसांची जोरदार तयारी!
लाल 🚨 दिवा-नाशिक,दि.३:-(विशेष प्रतिनिधी):संपूर्ण राज्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या आणि शासनाची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या ‘बोगस शालार्थ आयडी’ महाघोटाळ्यातील गुन्हेगारांची आता खैर नाही! या अत्यंत गुंतागुंतीच्या आणि राज्यभर गाजलेल्या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नाशिक शहर पोलिसांनी अत्यंत आक्रमक पाऊल उचलले आहे. पोलीस आयुक्त श्री. संदीप कर्णिक यांनी एका महत्त्वपूर्ण निर्णयात या महाघोटाळ्याचा तपास नाशिकचे ‘डॅशिंग’ अधिकारी, सहाय्यक पोलीस आयुक्त (ACP) श्री. संदीप मिटके यांच्याकडे वर्ग केला आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे बनावटगिरी करणाऱ्या मोठ्या रॅकेटचे धाबे दणाणले आहेत.
गेल्या १२ मार्च २०२६ रोजी नाशिक रोड पोलीस ठाण्यात (गुन्हा रजि. क्र. २१६/२०२६) या राज्यव्यापी महाघोटाळ्याचा पर्दाफाश झाला. शासनाची डोळ्यात धूळ फेकून बोगस शालार्थ आयडी तयार केल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२), ३३६(२), ३३८ आणि माहिती तंत्रज्ञान (IT) अधिनियम ६६(क) अंतर्गत अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासातच यामागे एक मोठे रॅकेट, अनेक बडे मध्यस्थ आणि आर्थिक गैरव्यवहारांची मोठी साखळी असल्याचे पोलिसांच्या तीक्ष्ण नजरेतून सुटले नाही. यात बनावट कागदपत्रे आणि संगणकीय प्रणालीचा मोठा गैरवापर झाल्याने हे प्रकरण अतिशय संवेदनशील बनले आहे.
‘सुपरकॉप’ संदीप मिटके भिडणार!
तपासाची हीच गुंतागुंत सोडवण्यासाठी आणि पांढरपेश्या गुन्हेगारांचे चेहरे उघड करण्यासाठी पोलीस आयुक्तांनी थेट एसीपी संदीप मिटके यांच्यावर विश्वास दाखवला आहे. एसीपी मिटके यांची ओळख नाशिक शहरात क्लिष्ट, संवेदनशील आणि गंभीर गुन्ह्यांची अचूक उकल करणारे धडाडीचे अधिकारी म्हणून आहे. त्यांच्या तपासाच्या ‘स्किल’ आणि प्रदीर्घ अनुभवामुळे आता या घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार लवकरच गजाआड होणार हे निश्चित मानले जात आहे.
कोणत्याही दोषीला सोडणार नाही! – पोलिसांचा ठाम इशारा
नाशिक शहर पोलिसांकडून या प्रकरणाच्या तपासाची चक्रे अतिशय वेगाने फिरू लागली आहेत. या घोटाळ्यातील लाभार्थी कोण? आर्थिक उलाढाल कशी झाली? आणि यात कोण-कोण सामील आहे? या सर्व बाबींचा अत्यंत पारदर्शक आणि सखोल तपास सुरू झाला आहे. “शासकीय तिजोरीला चुना लावणाऱ्या आणि शिक्षण क्षेत्राला काळिमा फासणाऱ्या कोणत्याही गुन्हेगाराला कायद्याच्या कचाट्यातून सूट दिली जाणार नाही,” असा सज्जड दमच नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाने दिला आहे. पोलिसांच्या या तत्पर आणि कडक भूमिकेमुळे सर्वसामान्यांमध्ये सुरक्षिततेचे व विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, आता संपूर्ण राज्याचे लक्ष एसीपी मिटके यांच्या कारवाईकडे लागले आहे!






